Current Affairs
20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांचा सहभाग
- 07/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जकार्ता येथे 7 सप्टेंबर 2023 रोजी 20 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत (EAS) पंतप्रधान सहभागी झाले.
आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली.
हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला.
आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
भारत-आसियान सहकार्य मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी 12-सूत्री प्रस्ताव सादर केला. संपर्क व्यवस्था, डिजिटल परिवर्तन, व्यापार आणि आर्थिक संलग्नता, समकालीन आव्हानांवर उपाय, लोकांचा थेट संपर्क आणि धोरणात्मक प्रतिबद्धता वाढवणे यांचा यात समावेश आहे.
12 सूत्री प्रस्ताव पुढील प्रमाणे:
1)दक्षिण-पूर्व आशिया-भारत-पश्चिम आशिया-युरोप यांना जोडणाऱ्या बहुआयामी संपर्क व्यवस्थेची आणि आर्थिक कॉरिडॉरची स्थापना
2)भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आसियान भागीदारांसह सामायिक करण्याचा प्रस्ताव
3)डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक संपर्क व्यवस्थेमधील सहकार्यावर लक्ष केंद्रित करून डिजिटल भविष्यासाठी आसियान-भारत निधीची घोषणा.
4)आपली प्रतिबद्धता दृढ करण्यासाठी आसियान आणि पूर्व आशियाच्या (ERIA) आर्थिक आणि संशोधन संस्थेला ज्ञान भागीदार म्हणून काम करण्यासाठी समर्थनाचे नूतनीकरण जाहीर.
5)बहुपक्षीय मंचावर ग्लोबल साउथला भेडसावणाऱ्या समस्या एकत्रितपणे मांडण्याचे आवाहन
6)आसियान देशांना WHO द्वारे भारतात स्थापन करण्यात येत असलेल्या पारंपारिक औषधांच्या जागितक केन्द्रात सामील होण्यासाठी आमंत्रण
7)मिशन LiFE वर एकत्र काम करण्यासाठी निमंत्रण
8)जन-औषधी केंद्रांद्वारे लोकांना परवडणारी आणि दर्जेदार औषधे पुरवण्याचा भारताचा अनुभव सामायिक करण्याचा प्रस्ताव
9)दहशतवाद, दहशतवादाला वित्तपुरवठा आणि चुकीच्या सायबर माहिती विरुद्ध एकत्रित लढा देण्याचे आवाहन
10)आसियान देशांना आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडीमधे सामील होण्याचे आमंत्रण
11)आपत्ती व्यवस्थापनात सहकार्याचे आवाहन
12)सागरी सुरक्षा, संरक्षण आणि संबंधित क्षेत्रातील जागरुकता यावर वर्धित सहकार्यासाठी आवाहन .
एक सागरी सहकार्यावर आणि दुसरे अन्न सुरक्षेवर अशी दोन संयुक्त निवेदने स्वीकारण्यात आली.
भारत आणि आसियान नेत्यांव्यतिरिक्त, तिमोर-लेस्ते हे या शिखर परिषदेत निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी, 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत, EAS यंत्रणेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि ते आणखी मजबूत करण्यासाठी आपले पाठबळ असल्याचे स्पष्ट केले.
आसियान केंद्रस्थानासाठी भारताचा पाठिंबा अधोरेखित करत मुक्त आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी भारत आणि आसियान यांच्यातील हिंद-प्रशांत क्षेत्राच्या दृष्टीकोनातील समन्वयावर प्रकाश टाकला आणि आसियान हा क्वाडच्या ध्येयदृष्टीचा केंद्रबिंदू असल्याचे अधोरेखित केले.
दहशतवाद, हवामान बदल, अन्न आणि औषधांसह जीवनावश्यक वस्तूंसाठी लवचिक पुरवठा साखळी तसेच ऊर्जा सुरक्षेसह जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी सहकार्याचे आवाहन केले. हवामान बदलाच्या क्षेत्रात भारताने उचललेली पावले आणि ISA, CDRI, LiFE तसेच OSOWOG सारख्या आपल्या उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.