नक्की कशी आहे 2025 ची MPSC परीक्षा? – MPSC Examination: Basic Information

राज्यसेवा परीक्षा स्वरुप

सद्याचे युग हे स्पर्धेचे युग’ आहे. स्पर्धा परिक्षेला बसणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय असतो.

निर्णय घेतल्यानंतर मात्र आपण लगेच अभ्यासाला सुरुवात करतो आणि अपयश आल्यानंतर मग त्याची कारणे शोधायला लागतो. जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात (First Attempt) यश मिळवायचे असेल तर MPSC परिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

 • सर्वप्रथम राज्यसेवेचे स्वरुप / संरचना समजून घ्या.
 • नंतर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम परिक्षेच्या अभ्यासक्रमाचे (Syllabus) विश्लेषण करा.
 • सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करा, त्यासाठी मागच्या कमीत कमी दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका (MPSC(old), UPSC PYQ) पहा.
 • मुख्य परिक्षेची तयारी झाल्यानंतरच मग पूर्व परिक्षेची तयारी सुरु करा.

अभ्यासाला सुरुवात करताना संदर्भ पुस्तके (Reference Books) चांगल्या दर्जाची निवडावीत. त्यानंतर मग अभ्यास हीच आपली भक्ती.

सदर लेखामध्ये आपण राज्यसेवेचे स्वरुप / संरचना कशी आहे ते समजून घेणार आहोत.

राज्यसेवा परीक्षा

सर्वसाधारणपणे राज्यसेवा परीक्षेमध्ये एकूण तीन टप्पे असतात.

 • राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 गुण ,
 • राज्यसेवा मुख्य परीक्षा 1750 गुण,
 • मुलाखत व व्यक्तिमत्त्व तपासणी 275 गुण.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणांकन (Negative Marking) असून प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा ¼ इतके गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा (MPSC Preliminary)

पूर्व परिक्षा ही मुख्य परिक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहीत मर्यादेत सिमित करण्यासाठी घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असते. राज्यसेवा पूर्व परिक्षा उत्तीर्ण झाल्यावरच मुख्य परिक्षा देण्याची संधी उपलब्ध होते. परंतु पूर्व परिक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत.

राज्यसेवा पूर्व परिक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Questions) असून एकूण 400 गुणांची असते. ज्यामध्ये पेपर क्र. 1 (200 गुण) अनिवार्य असून, पेपर क्र. 2 (200 गुण) हा अर्हताकारी आहे. पेपर क्र. 2 (CSAT) हा अर्हताकारी असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणार्या उमेदवारांची पेपर क्र. 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येते.

पेपर 1: सामान्य अध्ययन (General Studies)

पूर्व परिक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपरसाठी दोन तास वेळ असतो. यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नास दोन गुण असतात.

 • राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी (Current Affairs)
 • भारताचा इतिहास (History) व भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या संदर्भासह
 • महाराष्ट्र , भारत व जगाचा भूगोल (Geography)
 • भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन (Polity)
 • आर्थिक व सामाजिक विकास (Economy)
 • सामान्य विज्ञान (General Science)
 • पर्यावरण व पारिस्थितीकी (Environment), जैव विविधता (Biodiversity) आणि हवामान बदल (Climate Change)

पेपर 2 : CSAT

पेपर क्र. 2 हा अर्हताकारी आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेत सी-सॅटच्या पेपरसाठी 2 तास वेळ असतो. यामध्ये एकूण  80 प्रश्न विचारलेले असतात,

त्यासाठी एकूण 200 गुण असतात. एक प्रश्न हा अडीच गुणांसाठी असतो. या पेपरमधील Decision Making and Problem Solving घटकाकरीता नकारात्मक गुणांकन लागू नसते.

सी-सॅट मधील समाविष्ट घटक

 • आकलन
 • संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्ये
 • तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
 • निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
 • सर्वसाधारण मानसिक क्षमता
 • अंकगणित – मूळ संख्या, विदा अनुयोजन (Data Analysis)
 • मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तर)

राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वरुप (MPSC Mains)

 • महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या सुधारीत अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपाची असून एकूण 1750 गुणांची आहे. ज्यामध्ये सात अनिवार्य आणि दोन अर्हताकारी विषयांचा समावेश करण्यात आला आहे . पेपर 1 मराठी आणि पेपर 2 इंग्रजी यांचे स्वरूप पारंपरिक व वर्णनात्मक (Subjective) असून (300 गुण) हे दोन्ही पेपर 25% गुणांसह अर्हताकारी (Qualifying) आहेत.पेपर क्र. 3 (250 गुण) हा निबंध लेखनाचा आहे. तर पेपर क्र. 4 (सामान्य अध्ययन-1), पेपर क्र. 5 (सामान्य अध्ययन-2), पेपर क्र. 6 (सामान्य अध्ययन-3), आणि पेपर क्र. 7 ( सामान्य अध्ययन-4) हे सामान्य अध्ययनाचे पेपर असून याचे स्वरुप पारंपरिक व वर्णनात्मक असून प्रत्येकी 250 गुणांचे आहेत.तसेच सुधारीत अभ्यासक्रमानुसार आयोगाद्वारे आता एका वैकल्पिक विषयाचा (एकूण गुण 500) समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पेपर क्र. 8 व 9 (प्रत्येकी 250 गुण) हे दोन पेपर वैकल्पिक विषयाचे आहेत.

  पेपर क्र. 3 ते 7 साठी, उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याच्या पर्याय उपलब्ध असेल. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील. मुख्य परीक्षेचे ॲानलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरतानाच पेपर लिहीण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल.

पेपर – 1 व पेपर – 2 मराठी व इंग्रजी भाषेचे अर्हताकारी पेपर (प्रत्येकी 300 गुण)

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. तसेच हे पेपर अर्हताकारी स्वरुपाचे असून याचे गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.

पेपर – 3 निबंध लेखन (250 गुण) (Essay Writing)

उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहीणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांचेकडून अपेक्षित आहे.

पेपर – 4 सामान्य अध्ययन-1 (250 गुण) (General Studies-1)

या पेपरमध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह या घटकांचा समावेश होतो.

पेपर – 5 सामान्य अध्ययन-2 (250 गुण) (General Studies-2)

या पेपरमध्ये प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह या घटकांचा समावेश होतो.

पेपर – 6 सामान्य अध्ययन-3 (250 गुण) (General Studies-3)

या पेपरमध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह या घटकांचा समावेश होतो.

पेपर – 7 सामान्य अध्ययन-4 (250 गुण) (General Studies-4)

या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणार्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टीकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांची समावेश असतो. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी केस स्टडीचा वापर केला जातो.

पेपर – 8 व 9 वैकल्पिक विषय पेपर 1 व 2 (250 गुण) (Optional Subject)

यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे दिलेल्या वैकल्पिक विषयांच्या यादीमधील कोणताही एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो.