अजिंक्यसारखे बरेच विद्यार्थी आहेत जे राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा अशा दोन दगडांवर पाय ठेवण्याच्या नादात पूर्व परीक्षा पास तर मुख्य परीक्षा नापास अशा दुष्टचक्रात अडकतात; आत्मविश्वास गमावून डिप्रेशनमध्ये जातात आणि स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी ‘दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करावी का?’ हा प्रश्न घेऊन आपल्या मनासारखे उत्तर मिळावे या अपेक्षेने मार्गदर्शक शोधू लागतात. विद्यार्थ्यांची अपेक्षा असते की परीक्षा दोन आहेत तर मग अभ्यासाच्या वेळेचे विभाजन पन्नास-पन्नास टक्के करावे किंवा करण्याचा सल्ला मिळावा. मुळात ‘दोन्ही परीक्षांचा एकत्र अभ्यास कसा?’ हा प्रश्नच राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर जर मार्केट मधील कट ऑफ च्या काठावर आपले मार्क्स असतील तर उद्भवतो. कारण..
-
ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पास होण्याची पूर्ण खात्री असते ते राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी सुरु करतात.
-
ज्यांचा राज्यसेवा पूर्वचा स्कोअर एकदम कमी असतो ते संयुक्त पूर्वची तयारी जोमाने सुरु करतात.
-
ज्यांचे सुरुवातीपासून टार्गेट संयुक्त परीक्षाच असते ते राज्यसेवेच्या पाठीमागे लागतच नाहीत.
त्यामुळे ही द्विधा ‘ मनःस्थिती फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यावरच उद्भवते.
वरील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे मिळाली की राज्यसेवा परीक्षेची तयारी करावी की संयुक्तची तयारी करावी याचे उत्तर आपोआप मिळतेच. परंतू यानंतरही आपली द्विधा मनःस्थिती संपली नाही तर सरळ अभ्यासाच्या वेळेचे एकूण चार भाग करावेत, त्यातील तीन चतुर्थांश वेळ राज्यसेवेच्या अभ्यासाला द्यावा आणि एक चतुर्थांश वेळ संयुक्त परीक्षेच्या अभ्यासाला द्यावा. संयुक्त पूर्व किंवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी जर तुलना केली तर संयुक्त परीक्षेचा अभ्यासक्रम तुलनेने एक चतुर्थांशच आहे त्यामुळे वेळेचे विभाजन त्याचप्रमाणात करून दिवसाचे अभ्यासाचे टार्गेट्स पूर्ण करण्यावर भर दिला तर हा त्रिशंकू परिस्थितीतला वेळ योग्य पद्धतीने वापरता येऊ शकतो. यासाठी अभ्यासक्रमाचे योग्य विश्लेषण, योग्य नियोजन, त्याचे काटेकोर पालन, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायची तयारी, आणि फोकस्ड रिव्हिजन या पंचसुत्रीचा अवलंब केला पाहिजे. परंतू ही पंचसूत्री अमलात कशी आणायची याबाबत विद्यार्थी संभ्रमात पडतात. हा संभ्रम दूर करायचा असेल तर पुढील बाबी काटेकोरपणे पाळून अभ्यास केला पाहिजे.
1. अभ्यासक्रमाचे योग्य विश्लेषण
राज्यसेवा पूर्व ,राज्यसेवा मुख्य,संयुक्त पूर्व आणि संयुक्त मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम एकत्रितपणे पाहून त्यातील सामाईक मुद्दे बाजूला काढावेत. या सामाईक मुद्द्यांचे प्रत्येक परीक्षेत किती वेटेज आहे ते पाहून अशा मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ द्यावा हे ठरवावे. वेळेचे नियोजन करताना मात्र राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होईल या अनुषंगाने नियोजन करावे. कारण सामाईक मुद्दे जरी आपण वेगळे काढले असले तरी राज्यसेवेचा अभ्यासक्रम अधिक मोठा असल्यामुळे ठराविक कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणे ही तारेवरची कसरत ठरत असते. म्हणूनच राज्यसेवेसाठी तीन चतुर्थांश आणि संयुक्तसाठी एक चतुर्थांश वेळ असे अभ्यासाच्या वेळेचे विभाजन करावे.
2. अभ्यासाचे योग्य नियोजन
अभ्यासाचे नियोजन करताना साधारणपणे तीन ते चार महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले वेळापत्रक बनवावे. त्यामध्ये स्वयं विश्लेषण(Self Analysis) अभ्यासक्रमाचे आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण यासाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका यामधूनच आयोगाचा दृष्टीकोन समजत असल्यामुळे यासाठी दिवसातून ठराविक वेळ काढलाच पाहिजे. वाचनाची किंवा नोट्स काढण्याची सुरुवात करण्यापूर्वी त्या दिवशी ठरविलेल्या टॉपिकवर पूर्वी कोणत्या परीक्षेत ,किती आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे पाहून अभ्यासाची सुरुवात केली तर पुढचे वाचन एकदम टू द पॉइंट व्हायला मदत होते. त्यानंतर दिवसभराचा अभ्यास संपविल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक न उघडता दिवसभरातील अभ्यासाचे मुद्दे आठवायचा (मनन आणि चिंतन) प्रयत्न करावा. जे मुद्दे आठवत नाहीत ते उद्याचे प्रायोरिटी पॉइंट म्हणून टिपून ठेवावेत परंतू ते लगेच पुस्तकात पाहू नयेत. आपल्या मेंदूला आठवण्याचा सराव द्यावा लागतो तरच तो तुम्हाला परीक्षेत मदत करू शकतो. रात्री झोपल्यानंतर सबकॉन्शिअस माइंडमध्ये आपल्याला अडलेल्या मुद्द्यांचा विचार होतो. त्यातील काही मुद्दे आठवतात ही … अन जर नाही आठवले तर दुसऱ्या दिवशी जेंव्हा ही अडलेली उत्तरे आपण पुस्तकात पाहतो तेंव्हा ती पक्की लक्षात राहतात. नियोजनाच्या काटेकोर अंमलबजावणीची सवय लागेपर्यंत सुरुवातीला सोपा अभ्यासक्रम हाती घ्यावा जेणेकरून आपले टार्गेट पूर्ण करणे सोपे जाईल आणि हळू हळू रोजच्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास करण्याची सवय लावावी.
3. केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी
ठरविलेले नियोजन योग्य प्रकारे पार केले जाते की नाही हे पाहण्यासाठी आठवड्याचे अभ्यासाचे तास, उजळणीचे तास, प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे तास दररोज मोबाईल मध्ये टायमर लावून मोजावेत. जी गोष्ट मोजली जाऊ शकते तिच्यात नक्कीच सुधारणा केली जाऊ शकते. सुरुवातीला वेळापत्रक पाळताना थोडी धावपळ होऊ शकते परंतू Give Up न करता एकदा का सलग एक आठवडा हे वेळापत्रक पाळले आणि जिथे जिथे वेळ वाया जातो असे Time Slot हेरले की त्या Time Slot मध्ये काहीतरी Productive मुद्दे बसविण्याचा प्रयत्न करावा. सलग दोन आठवडे जर असे वेळापत्रक पाळले गेले की त्याची सवय होऊन जाते आणि मग आपला मेंदू आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक सक्षमपणे काम करायला सुरु करतो आणि मग अपेक्षेच्या पलीकडचे रिझल्ट्स मिळू लागतात.
4. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची तयारी
बऱ्याचदा आपण पाहतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी यश मिळवितात परंतू जे विद्यार्थी स्वतःचा कम्फर्ट झोन सोडत नाहीत ते मात्र त्रिशंकू अवस्थेत अडकून राहतात. नियोजन करणे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, नियोजित अभ्यासाची अंमलबजावणी झाली नाही तर आपल्या मेहनतीतील चुका शोधून त्या दुरुस्त करणे या सर्व गोष्टी करण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सगळीकडे आणि संपूर्ण वेळ आपला अभ्यास आणि परीक्षेतील यश याचेच विचार सतत डोक्यात राहिले पाहिजेत. त्यामध्ये डिस्टर्बन्स आणणारे सर्व अडथळे बाजूला केले पाहिजेत. एका वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याचा आपण निर्णय घेतला असेल तर इतरांपेक्षा किमान दोन तास तरी अधिक अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे आणि हा अभ्यासाचा वेळ वाढविण्यासाठी दिवसभरातील अनावश्यक बाबींवर खर्च होणारा वेळ वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करू शकू.
5. फोकस्ड रिव्हिजन
बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास म्हणजे वाचन असा अर्थ घेतात आणि रिव्हिजनकडे दुर्लक्ष करतात कारण पुस्तके संपविण्याची घाई झालेली असते. परंतू यामुळे होतं काय…पुढचं पाठ आणि मागचं सपाट. अभ्यासाचा आभास निर्माण होतो आणि परीक्षेच्या तोंडावर या रिव्हिजनला वेळ कमी मिळतो. त्यामूळे माहित असूनही कन्फ्युजन होऊन परीक्षेच्या वेळी उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने रिव्हिजनचे नियोजन आणि अंमलबजावणी केली तरच एका दगडात दोन पक्षी मारण्याचं कसब जमू शकतं. अशी अभ्यासाची अमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक सवय लावून घ्यावी लागते, त्यासाठी तुम्ही तुमच्या नियोजनाच्या अमलबजावणीवर लक्ष ठेवणारा एखादा accountability partner किंवा तुमचा Personal Mentor ही शोधून तुमच्या अभ्यासाच्या अमलबजावणी चे मूल्यमापन करू शकता.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो तुम्ही जर या दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास करणार असाल तर वरील पंचसूत्रीचे पालन करा, ते करताना काही अडथळे येत असतील तर आमच्याशी खालील email id वर जरूर संपर्क साधा. स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासक्रमाचे विश्लेषण, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, स्वयं विश्लेषण अशा मुद्द्यांवरील आमचे पुढील blog वाचत राहा.