MPSC : करियरचा उत्तम उपाय


विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, दहावी, बारावी किंवा पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर असतो तो म्हणजे पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर (career) करावे बरे? 

करिअरची निवड करण्याचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा व कठिण निर्णय असतो. करिअर म्हणजे केवळ आपण आपल्या उदरनिर्वाहाकरिता भविष्यामध्ये कोणते काम करणार आहोत, एवढाच संकुचित अर्थ होत नाही. तर त्या कामाद्वारे उदरनिर्वाहाबरोबरच आनंद, समाधान व सृजनशीलतेला (Creativity) देखील वाव मिळाला पाहिजे. मग जर करिअर निवडीवर  आपले पूर्ण भविष्य अवलंबून असेल तर त्यासाठी आपण सखोल विचारांती निर्णय घेणे फार आवश्यक आहे.

आपल्यासाठी योग्य करिअरची निवड (Career Option) करण्यापूर्वी आपण पुढील 4 बाबींचा विचार आधी करावा, ज्यामुळे करिअर निवडल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागणार नाही.

  1. ‘स्व’ ची ओळख 
    • ‘स्व’ची ओळख म्हणजे स्वत:च्या आवडी-नावडी, क्षमता, कौशल्य, मुल्य यांची तुम्हाला स्वत:ला जाणीव असणे होय. करिअर निवडीमध्ये विचारात घ्यावा लागणारा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
  1. विविध क्षेत्रांचा आढावा 
    • कोणकोणती क्षेत्रे व उपक्षेत्रे उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रांमध्ये तुमच्यासाठी योग्य अशा संधी उपलब्ध आहेत का? 

       जसे – खाजगी क्षेत्र, शासकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र इ.

  1. निर्णय 
    • उपलब्ध क्षेत्र आणि संधी यांचा तुलनात्मक अभ्यास करुन तुम्हाला स्वत:ला सोईस्कर व तुमच्या सृजनशीलतेला वाव मिळेल अशा क्षेत्राची निवड करावी.
  1. प्रत्यक्ष कृती 
    • निवडलेल्या क्षेत्रामध्ये उपलब्ध संधी मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्याने प्रत्यक्ष प्रयत्न करणे.

मित्रांनो, करिअरसाठी आज अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत त्यापैकी एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे प्रशासकीय सेवा होय. याच प्रशासकीय सेवा विषयी आपण सदर लेखामध्ये चर्चा करणार आहोत.

मित्रांनो, समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवणे, सामाजिक प्रश्नांची सोडवणुक करणे किंवा विकासविषयक कामे पार पाडणे यासाठी

 प्रशासकीय सेवा म्हटले की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यांसमोर येते ते म्हणजे MPSC.  MPSC मधून प्रशासकीय क्षेत्रामध्ये उत्तम करियर का बनू शकते? कारण त्यातून मिळणाऱ्या विविध संधी किंवा फायदे होत. जसे 

  • नोकरीचे समाधान 
    • प्रशासकीय अधिकारी बनल्यामुळे ‘स्वत:ला मिळणारे समाधान’ ही बाब जास्त महत्वाची आहे. या क्षेत्रामध्ये काम करताना विविध आव्हानांना सातत्याने सामोरे जावे लागणे व त्यावर मात करणे, ही सर्वाधिक समाधानाची बाब आहे.
  • राष्ट्र निर्मितीमध्ये सहभाग 
    • सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची संधी तुम्हाला येथे मिळते.
  • कामामधील वैविध्य 
    • केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच एकावेळी विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते, जसे उपजिल्हाधिकारी हे महसुल प्रशासन, न्याय प्रशासन, विकास विषयक कामे पार पाडत असतात.
  • वैयक्तिक विकास 
    • सामाजिक बांधिलकी व कर्तव्य पार पाडतानाच अधिकाऱ्यांना वैयक्तिक विकासदेखील साध्य करता येतो. विविध प्रशिक्षण कार्यक्रम, भारतातील व परदेशातील अभ्यासाद्वारे, नामांकित विद्यापीठामधून उच्च शिक्षण घेण्याची संधी, जागतिक मंचावर प्रतिनिधित्व करण्याची संधी इ. प्राप्त होतात.
  • नोकरीची शाश्वतता 
    • राजपत्रित अधिकारी बनल्यामुळे तुम्हाला राज्यघटनेचे संरक्षण प्राप्त होते. परिणामी तुम्हाला कोणीही मनमानीपणे नोकरीवरून काढू शकत नाही.
  • सामाजिक प्रतिष्ठा 
    • भारतीय समाज आजही विकसनशील अवस्थेत असल्यामुळे अशा समाजाच्या विकासामध्ये शासकीय अधिकारी महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे समाजात प्रशासकीय अधिकाऱ्यांना मान-मरातब मिळतो.
  • आर्थिक स्थैर्य 
    • सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्तम पगार मिळतो. शिवाय पगाराबरोबरच निवासस्थान, गाडी, नोकर इ. सवलती प्राप्त होतात.

तेव्हा अशा अनेक संधींनी परिपूर्ण असणारे प्रशासकीय क्षेत्र हे करियरसाठी नक्कीच उत्तम पर्याय ठरते.

परंतु प्रशासकीय क्षेत्राची करियर म्हणून निवड करताना स्वत:ला ओळखणे महत्वाचे ठरते. या क्षेत्रामध्ये प्रवेश करताना आपल्या कुटूंबियांना विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर सुरूवातीची किमान दोन वर्षे संपूर्णपणे झोकून देऊन तयारी करणे व परिक्षा देणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र तुम्ही अर्धवेळ काम करून देखील तयारी सुरू ठेऊ शकता.