एकदा एक महिला लॉटरी तिकीट विकत घेण्यासाठी दुकानात गेली. तिने दुकानदाराला क्रमांक 50 असणाऱ्या तिकीटाची मागणी केली पण दुकानदाराकडे अशा प्रकारचे त्याच क्रमांकाचे तिकीट उपलब्ध नव्हते. त्या महिलेने मात्र 50 क्रमांकाचेच तिकीट हवे असल्याचा हट्ट धरला होता. शेवटी हतबल होऊन दुकानदाराने त्या महिलेला दोन दिवसानंतर यायला सांगितले. दरम्यान दुकानदाराने ज्या ग्राहकाला क्रमांक 50 चे तिकीट विकले होते त्याच्याशी संपर्क साधला आणि ही परिस्थिती सांगितली. त्या ग्राहकाने विचार केला की संभाव्यता तत्वाचा (Probablity) विचार केला तर कोणताही क्रमांक विजयी होऊ शकतो. तेंव्हा त्याने आपल्याकडील क्रमांक 50 चे तिकीट परत केले आणि त्याबदल्यात दुसऱ्या क्रमांकाचे तिकीट घेतले. हे तिकीट दुकानदाराने त्या महिलेला दिले.
दोन आठवड्यांनी लॉटरी चा निकाल लागला आणि आश्चर्य म्हणजे त्या महिलेकडील क्रमांक 50 च्याच तिकिटाला तब्बल 2 कोटी रुपयांची लॉटरी लागली!! जेंव्हा पत्रकारांनी त्या महिलेला तिच्या लॉटरी तिकिटाच्या निवडीमागील रहस्य विचारले तेंव्हा ती महिला लाजू लागली. बराच आग्रह केल्यानंतर ती म्हणाली की माझ्या स्वप्नामध्ये 7 हा क्रमांक सलग 7 दिवस येत होता मग साता साता पन्नास म्हणून मी 50 क्रमांकाचे तिकीट खरेदी केले. अच्युत गोडबोले सरांनी त्यांच्या ‘गणिती’ या ग्रंथामध्ये वरील प्रसंग रेखाटला आहे. याचा निष्कर्ष असा की वरील महिलेला लागलेली लॉटरी ही खरंच एक योगायोग किंवा नशिबाचा भाग म्हणता येईल.
जर येथे आपण MPSC करणाऱ्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला तर परीक्षेतील तुमचे यश ‘साता सात पन्नास’ प्रमाणे नशिबाची लॉटरी आहे का? तर तसे नक्कीच नाही. स्पर्धा परीक्षेतील यश हे ‘अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि सखोल विश्लेषणाअंती आखलेल्या आणि अमलात आणलेल्या नियोजनाचा’ परिणाम असते. म्हणूनच विद्यार्थी मित्र-मैत्रिणिनो स्पर्धा परीक्षेतील यशाचा जो मार्ग आहे, जो प्रवास आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्याचा प्रारंभ किंवा सुरुवातीचा टप्पा म्हणजे ‘विश्लेषण’ होय. हे विश्लेषण पुढील तीन प्रकारचे असते.
1. स्व-विश्लेषण
2. अभ्यासक्रमाचे विश्लेषण
3. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
यापैकी आपण येथे ‘अभ्यासक्रमाचे विश्लेषण’ या विषयी चर्चा करणार आहोत.
अभ्यासक्रम म्हणजे काय?
महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील विविध पदांसाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्वरूपाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यासाठी दिशादर्शक म्हणून अभ्यासक्रमाची रचना केली जाते.
अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाची आवश्यकता
1. सहज आकलन: आयोगाने दिलेल्या क्लिष्ट अभ्यासक्रमाचे सोप्या पद्धतीने आकलन होण्यासाठी विश्लेषण आवश्यक असते.
2. दिशादर्शन : विश्लेषित अभ्यासक्रमामुळे आपल्या अभ्यासाला नेमकी दिशा प्राप्त होते.
3. परस्परव्यापी मुद्दे (Overlapping Points) : विविध विषयांदरम्यान बरेचसे घटक हे समान असल्याचे विश्लेषणाअंती समजून येते. ज्यामुळे अशा सर्व परस्परव्यापी घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यास वेळेची व श्रमाची देखील बचत होते.
4. काय वाचू नये? : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना ‘वेळेची कमतरता’ सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी ‘काय वाचावे?’ यापेक्षा ‘काय वाचू नये?’ हे समजल्यास आपला बराच वेळ वाचू शकतो. कारण एखादा मुद्दा अभ्यासक्रमात नसला तरी एखाद्या संदर्भग्रंथामध्ये समाविष्ठ आहे म्हणून बरेच विद्यार्थी तो मुद्दा वाचण्यात आपले श्रम आणि वेळ वाया घालवतात.
अभ्यासक्रमाचे विश्लेषण कसे करावे?
वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाचे महत्व पाहता साहजिकच अभ्यासक्रमाचे विश्लेषण नेमके कसे करावे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर त्याचे नेमके एक असे उत्तर नाही. कारण अनेक मार्गांनी असे विश्लेषण करता येते. जसे –
1. दिलेल्या अभ्यासक्रमाचा कालखंडानुसार क्रम लावल्यास अध्ययन सोपे होते. उदा. इतिहास. तसेच अभ्यासक्रमातील मुद्द्यांचा क्रम बदलल्यास अर्थशास्त्राचा अभ्यास सोपा होतो.
2. अभ्यासक्रमाचे विभाजन प्रदेशानुसार सुसंबद्ध रीतीने केल्यास श्रम वाचू शकतात. उदा. प्राकृतिक भूगोल ( पृथ्वी किंवा जागतिक स्तर), भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. पुन्हा त्यामध्ये बारकाईने अभ्यास करताना भारताचा भूगोल हा प्राकृतिक, आर्थिक, मानवी अशा प्रकारांमध्ये विभागू शकतो.
3. क्लिष्ट अभ्यासक्रम जर विविध घटक व उपघटकांदरम्यान विभागाला तर त्याचे अध्ययन सोपे होते.
अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाची पूर्वतयारी :
अभ्यासक्रमाचे विश्लेषण करण्यासाठी काही पूर्वतयारी किंवा टप्पे पार पाडावे लागतात. जसे –
1. संबंधित विषयाची किमान शालेय पाठ्यपुस्तके व NCERT यांचे वाचन अपेक्षित आहे. ज्यामुळे विषयाचा आवाका लक्षात येतो.
2. अभ्यासक्रमाचे किमान तीन ते चार वेळेस शांतपणे वाचन आवश्यक आहे.
3. अभ्यासक्रमाचे विश्लेषण पहिल्याच प्रयत्नामध्ये परिपूर्ण रुपात करता येईल याचा अट्टाहास बाळगू नये.
4. आपण केलेले विश्लेषण योग्य आहे का? हे आपल्या शिक्षकाकडून किंवा मेंटॉर/मार्गदर्शकाकडून तपासून घ्यावे.
विद्यार्थी मित्र – मैत्रिणींनो वरीलप्रमाणे आपण अभ्यासक्रमाचे जेवढे सखोल विश्लेषण करू तेवढी विषयाबाबतची समज आणि आकलन वाढते, अभ्यासाला दिशा प्राप्त होते व एक गती मिळते. म्हणूनच लढाईला जाण्यापूर्वी जशी तलवारीला धार लावावी लागते तसेच स्पर्धा परीक्षांचे शिवधनुष्य पेलण्यास जाण्यापूर्वीच अभ्यासक्रमाचे स्वतःच्या गुणावगुणांचे आणि जी परीक्षा देणार आहोत त्या परीक्षेत यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करणे अत्यंत महत्वाचे आहे. चला तर मग अभ्यासाचे योग्य विश्लेषण करून आपल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करायला सुरुवात करा, ते करताना काही अडथळे येत असतील तर आमच्याशी contact us मध्ये दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, अभ्यासाची रणनीती अशा मुद्द्यांवरील आमचे पुढील blog वाचत राहा.