Current Affairs
देशात 3,167 वाघांची नोंद
- 10/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसूरु येथे देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आकडेवारी जाहीर केली . यात देशातील एकूण 3,167 वाघांची नोंद करण्यात आली. 1973 मध्ये नऊ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना 53 राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. 23 व्याघ्र संरक्षित क्षेत्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
केरळमधील पेरियर व्याघ्र प्रकल्प देशात प्रथम स्थानी
केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्पाने 94.38% सह देशात प्रथम स्थान मिळविले आहे . त्याखालोखाल मध्य प्रदेशातील सातपुडा आणि बांदीपूरचा क्रमांक लागतो.
देशातील 12 व्याघ्रप्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रवर्गात स्थान मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प 8 व्या स्थानी
91 टक्क्यांसह महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प 8 व्या स्थानावर आहे. उत्कृष्ट प्रवर्गामध्ये राज्यातील ताडोबा-अंधारी( 14 व्या), मेळघाट(16 व्या), नवेगाव – नागझिरा (20 व्या), सह्याद्री(27 व्या) आणि बोर(29 व्या) स्थानी आहेत. महाराष्ट्रातील सहाही व्याघ्र प्रकल्पांनी उत्तम कामगिरी नोंदवली आहे.
अव्वल क्रमांकासाठीचे निकष
जंगलांच्या मूल्यमापनासाठी 33 निकष ठरविण्यात आले होते.
यामध्ये ,व्याघ्र प्रकल्पातील कामांचे दस्तावेजीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, व्याघ्रसंवर्धन आराखडा, लोकसहभाग ,अधिवास व्यवस्थापन, मानव – वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन , संसाधनांची उपलब्धता, आर्थिक संसाधने, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, जंगलाभोवतालच्या लोकांच्या उत्पन्नाची साधने, जंगलातील गावांचे स्थानांतरण , कोअर भागातील पर्यटनावर आळा घालणे, आर्थिक व्यवस्थापन, वन्य प्राण्यांच्या संख्येवर झालेला परिणाम, व्याघ्रसंख्येतील बदल, पर्यटकांचे समाधान इ. निकषांचा समावेश होता.
वर्षनिहाय भारतातील वाघांची संख्या
वर्ष |
वाघांची संख्या |
2006 |
1,411 |
2010 |
1,706 |
2014 |
2,226 |
2018 |
2,967 |
2022 |
3,167 |