Current Affairs
पुणे येथे होणाऱ्या जी 20 समूहाच्या चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीनिमित्त शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरात जनभागीदारी कार्यक्रमांचे आयोजन
- 02/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा जनतेच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यावर मुख्य भर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून शिक्षण मंत्रालय विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करत आहे.
एफएलएन अर्थात पायाभूत साक्षरता आणि मोजणीच्या ज्ञानाची ग्वाही या संकल्पनेला मिश्र शिक्षणाच्या संदर्भात चालना देणे आणि पाठबळ देणे हे या कार्यक्रमांच्या आयोजनामागचे उद्दिष्ट आहे.
हे लक्ष्य गाठण्यासाठी शिक्षण मंत्रालय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या भागीदारीत देशभरात जनभागीदारी कार्यक्रम राबवत आहे.
जनजागृतीबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणात समाज या विविध भागधारकांमध्ये जी 20, राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि पायाभूत साक्षरता व मोजणीचे ज्ञान (एफएलएन) याबद्दल अभिमानाची भावना तयार करणे हा त्यामागचा हेतू आहे.
1 जून पासून सुरू झालेल्या या जनभागीदारी कार्यक्रमांत कार्यशाळा, प्रदर्शने, परिसंवाद आणि परिषदा असा भरगच्च कार्यक्रम आहे.
15 जून रोजी या कार्यक्रमांचा समारोप होईल. सर्व स्तरातील लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, पंचायत आणि शालेय अशा स्तरावर हे कार्यक्रम होणार आहेत.
महाराष्ट्रातील पुणे येथे चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चा सत्र होणार आहे. हा मुख्य जनभागीदारी कार्यक्रम 19 ते 21 जून दरम्यान होत आहे. 22 जून 2023 रोजी होणाऱ्या शिक्षण मंत्रिस्तरीय बैठकीने या कार्यक्रमाचा समारोप होईल.