क्षयरोग झालेल्या मुलांमध्ये त्याचा संसर्ग न झालेल्या मुलांच्या तुलनेत ‘ड’ जीवनसत्वाची अधिक कमतरता आढळते असा निष्कर्ष तेलंगणामध्ये रुग्णालयात केलेल्या संशोधनातून काढण्यात आला. क्युरियस या नियतकालीकात यासंदर्भातील संशोधन प्रकाशित झाले आहे.
टीबी झालेल्या मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता अधिक असून ती 10 नॅनोग्रामपेक्षा कमी असल्याचे संशोधकांना आढळले.
तेलंगांमधील सिद्धीपेठ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी संयुक्तपणे हे संशोधन केले. त्यासाठी त्यांनी निलोफर रुग्णालयातील काळजी केंद्रात टीबीचा संसर्ग झालेल्या मुलांचा सुमारे दीड वर्ष अभ्यास केला.या मुलांमध्ये सहा महिन्यांपासून बारा वर्षांपर्यंतच्या 70 मुलांचा समावेश होता.
संशोधकांनी सहभागी मुलांची वयोगटानुसार एक ते चार वर्ष, पाच ते आठ आणि नऊ ते बारा या तीन वयोगटात विभागणी केली. त्यावेळी मुलांमध्ये ड जीवनसत्त्वाची सरासरी पातळी 10.43 नॅनोग्राम असल्याचे आढळले.
टीबी असलेल्या मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची तीव्र कमतरता असल्याचे संशोधकांनी सांगितले.
टीबी हा जगभरात वेगाने पसरणाऱ्या घातक संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. विकसित देशांमध्ये सहव्याधी तसेच मृत्यूचेही टीबी प्रमुख कारण आहे.


