केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 20 जुलै रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि विशेष अतिथी म्हणून नेपाळचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री डॉ. बेडू राम भुसाल यांच्या उपस्थितीत पहिल्या वहिल्या जागतिक अन्न नियामक शिखर परिषद 2023चे नवी दिल्ली उद्घाटन केले.
उद्देश:-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कक्षेत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून अन्न मूल्य साखळी अंतर्गत नियामक चौकट आणि अन्न सुरक्षा प्रणाली बळकट करण्यासंदर्भात विचार आणि दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी अन्न नियामकांना जागतिक मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
WHO च्या महासंचालकांचा संदेश:
- जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधोनम गेब्रेयसस यांनी आपल्या ध्वनीमुद्रित व्हिडिओ संदेशाद्वारे, ही पहिली जागतिक अन्न नियामक परिषद आयोजित केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI ) यांचे अभिनंदन केले.
- “सर्वांना, सर्वत्र सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचा लाभ घेता येईल हे आपण सर्वांनी एकत्रितरित्या सुनिश्चित केले पाहिजे” असे हे डॉ. टेड्रोस गेब्रेयसस आपल्या संदेशात म्हणाले.
- यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सामान्य नियामक व्यासपीठ ‘संग्रह’ – राष्ट्रांसाठी सुरक्षित अन्न: जागतिक अन्न नियामक प्राधिकरण पुस्तिका देखील प्रकाशित केली.
- ही पुस्तिका म्हणजे, जगभरातील 76 देशांच्या अन्न नियामक प्राधिकरणांचा डेटाबेस असून यात त्या देशांचे आदेश, अन्न सुरक्षा व्यवस्था, अन्न चाचणी सुविधा, अन्न प्राधिकरणांचे संपर्क तपशील, SPS/TBT/Codex/WAHO इत्यादींचा समावेश आहे.
- ‘संग्रह’ हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त गुजराती, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या सहा प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे.
- डॉ. मांडविया यांनी जागतिक अन्न नियामक शिखर परिषद – 2023 दरम्यान दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनही केले.
- हे प्रदर्शन अन्न सुरक्षा, अन्न मानके, अन्न चाचणी क्षमता, उत्पादन सुधारणा आणि अन्न तंत्रज्ञानातील प्रगती याविषयी कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मार्ग प्रदान करेल.
- या प्रदर्शनात 35 तज्ञ आपले अनुभव आणि योगदान याविषयी माहिती देतील. प्रदर्शनात श्री अन्न (भरड धान्य) वरील स्टॉल्स देखील लावण्यात आले आहेत.
- या व्यासपीठाचा उपयोग, शिकण्यासाठी, अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी, संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत मार्गाने अन्न सुरक्षेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक यंत्रणा तयार करावी असे आवाहन जी-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी केले.
- लवचिक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज ओळखून अन्नाची नासाडी कमी करणे, अन्न पुरवठा वाढविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करणे आणि भरड धान्यासारख्या सर्व हवामानात टिकणाऱ्या पिकांच्या वापरास प्रोत्साहन देणे यावर अमिताभ कांत यांनी भर दिला.


