भारत–कतार व्यापार दुप्पट करण्यावर सहमती
- भारत आणि कतारदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार पुढील पाच वर्षांमध्ये दुप्पट करून 28 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सामरिक भागीदारीच्या स्तरापर्यंत उंचावत असल्याचेही जाहीर करण्यात आले.
- कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल-थानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली.
- त्यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सामान्य जनतेचा आपापसातील संपर्क यावर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.
- भारत आणि कतारदरम्यान मंगळवारी दोन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. एक करार सामरिक भागीदारी करण्याविषयी आहे आणि दुसरा सुधारित दुहेरी कर टाळण्याचा करार आहे.
- त्याशिवाय आर्थिक भागीदारी मजबूत करणे, अभिलेखागारांचे व्यवस्थापन आणि युवा व्यवहार व क्रीडा प्रकारांमध्ये सहकार्य याविषयी पाच सामंजस्य करारही करण्यात आले.
- सामरिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचे सध्याचे द्विपक्षीय संबंध सामरिक स्तरापर्यंत उंचावणार आहेत. व्यापार, ऊर्जा सुरक्षा तसेच प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर आहे.