महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन
- महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी गटाच्या गादी विभागातील शिवराज राक्षे वि. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालाची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने घेतला आहे.
- फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अहिल्यानगर येथे ही स्पर्धा झाली होती.
- या लढतीत पंचांनी शिवराज राक्षेला चीतपट देण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता.
- त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताबही पटकावला. मात्र, राक्षेला चीतपट देण्याचा निर्णय आजही चर्चेत असून पंचांच्या चुकीमुळेच मोहोळ जिंकला असा आरोप होत आहे.
- या निर्णयानंतर रागाच्या भरात पंचांना मारहाण करणाऱ्या राक्षेवर राज्य कुस्तीगीर संघाने तीन वर्षाची बंदी घातली.
- या प्रकरणानंतर किताब लढतीनंतर कुस्ती संघाने स्वतःहून राक्षे आणि मोहोळ यांच्यातील सामन्याच्या चौकशी करिता समिती नेमण्याचा निर्णय घेतला .
- आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश गुंड, सुनील देशमुख, नामदेव बडदरे आणि विशाल बलकवडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
- या समितीला 28 फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी दिली.
- गादी विभागातील या अंतिम लढतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे अनुभवी पंच म्हणून नितेश काबुलिया, तर मॅट व्यवस्थापक म्हणून दत्तात्रय माने, दुसरे पंच म्हणून विवेक नाईकल यांची नियुक्ती करण्यात आली होती.