महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात हरित अच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी- चिंचवड महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला.
पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला .
अमृत गटातील अव्वल क्रमांकासाठी आठ कोटी रुपये व प्रमाणपत्र आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी दोन कोटी रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्रात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले.
10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी पालिकेने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.
अभियानामध्ये अमृत शहरांसाठी विविध प्रकारात गुण निश्चित करण्यात आले होते.
यामध्ये शहरातील हरित अच्छादित आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन व पुनरुज्जीवन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रचार व प्रसार, शहरांमध्ये एलईडी दिव्यांचा वापर, सौरऊर्जेचा वापर, बायोगॅसचा वापर ,अभियानाचा प्रचार व प्रसार, पर्यावरण दूतांची नियुक्ती, अभियानातील नागरिकांचा सहभाग, माझी वसुंधरा अंतर्गत जगवलेल्या वृक्षांची संख्या, पूर्तता इत्यादी बाबींचा समावेश होतो.


