● आपले संपूर्ण आयुष्य जंगलात वेचलेले, जंगल आणि वन्यप्राण्यांवर मनापासून प्रेम करणारे, त्यांचा अभ्यास असलेले ‘अरण्यऋषी’ मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. ते गेली काही वर्षे सोलापुरातील आपल्या मूळगावी वास्तव्यास होते.
● चितमपल्ली यांचा जन्म 1932 या वर्षी सोलापुरात झाला.
● तेलुगु आणि उर्दू भाषकांच्या बुधवार बाजार, साखर पेठेत त्यांचे बालपण गेले.
● सोलापुरात नॉर्थकोट प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
● 2006 साली सोलापुरात झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
● वनखात्यात 36 वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावत असताना वन्यजीव,पर्यावरणाचा सखोल अभ्यास त्यांनी केला.
● निसर्गाविषयी ललित, संशोधनपर माहितीपूर्ण लेखन केले.
● सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते अनेक वर्षे जंगलात राहिले.
● त्यांच्या ‘रातवा’ पुस्तकाला १९९३-९४ साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता.
● अन्य अनेक साहित्य पुरस्कारांवरही त्यांनी आपले नाव कोरले आहे.
● शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी कोईमतूर फॉरेस्ट कॉलेज, बंगळुरू, दिल्ली, डेहराडून, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश) आदी ठिकाणच्या वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले.
● नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत, तसेच पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे, वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले.
● याशिवाय जर्मन आणि रशियन भाषा अवगत करतानाच पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली.
● वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले.
● आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन निबंधवाचनही केले.
● वन खात्याच्या विविध महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना 1990 साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले.
● कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात चितमपल्ली यांनी भरीव योगदान दिले.
● सेवाकाळ आणि निवृत्ती पक्षात अनेक संस्था आणि समित्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
● जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली वन्यप्राणी संस्थेचे – संस्थापक सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
● याशिवाय राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (छत्रपती संभाजीनगर) व इतर संस्थांचे सदस्य आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी त्यांनी कार्य पाहिले.
● विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, दमाणी साहित्य पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान, महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार, नागभूषण पुरस्कार, वसुंधरा सन्मान, भारती विद्यापीठ जीवनसाधना यासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.
साहित्य संपदा:
● चितमपल्ली यांना 18 भाषा अवगत होत्या. वनाधिकारी म्हणून नोकरी करीत असताना त्यांना समृद्ध निसर्गाचा सहवास लाभला.
● पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यासक असलेल्या चितमपल्ली यांनी त्यांचे जंगलातील अनुभव तसेच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललित लेखनाचा मार्ग स्वीकारला.’ पक्षी जाय दिगंतरा’, ‘जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचे धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’, ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’, ‘आनंददायी बगळे’, ‘निळावंती’, ‘पक्षिकोश चैत्रपालवी’, ‘केशराचा पाऊस’, ‘चकवाचांदण एक वनोपनिषद’, ‘चित्रग्रीव’, ‘जंगलाची दुनिया’, ‘नवेगावबांधचे दिवस’ ही चितमपल्ली यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.