रेल्वे प्रवाशांना निर्धोक, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दल अहोरात्र कार्यरत असते. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात, आरपीएफने विविध मोहिमांच्या माध्यमातून प्रशंसनीय कामगिरी करून दाखवली आहे :-
मोहीम “नन्हें फरिश्ते” – हरवलेल्या मुलांची सुटका:
● “नन्हें फरिश्ते” या मोहीमेअंतर्गत आरपीएफने काळजी तसेच संरक्षणाची गरज असलेल्या 520 हून अधिक लहान मुलांची त्यांच्या कुटुंबाशी पुनर्भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
● ही मुले विविध कारणांमुळे आपापल्या कुटुंबांपासून दुरावली होती.
मानवी तस्करी विरोधी उपक्रम (एएएचटी मोहीम) –
● नोव्हेंबर 2023 मध्ये आरपीएफच्या मानवी तस्करी विरोधी पथकांनी (एएचटीयुज) तस्करांच्या तावडीतून 35 जणांची सुटका केली.
मोहीम “जीवन रक्षा” – जीव वाचवणे:
● आरपीएफमधील जवानांच्या सावध तसेच जलद कृतीमुळे 224 प्रवाशांचा जीव वाचला. चालत्या गाडीतून चढता-उतरताना अपघाताने फलाटावर तसेच रेल्वेच्या रुळांवर पडल्यामुळे या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
महिला प्रवाशांचे सक्षमीकरण – “मेरी सहेली” उपक्रम:
● नोव्हेंबर 2023 मध्ये 229 “मेरी सहेली” पथकांनी 13,552 रेल्वे गाड्यांना भेटी दिल्या आणि 4,10,259 महिला प्रवाशांना सुरक्षितताविषयक सेवा दिली.
● महिलांसाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करताना आढळून आलेल्या 4618 व्यक्तींविरुद्ध देखील आरपीएफने कारवाई केली.
तिकीटांच्या दलालांचे गैरव्यवहार रोखणे (मोहीम “उपलब्ध”):
● तिकीट दलालांविरुद्धच्या कारवाईदरम्यान आरपीएफने नोव्हेंबर 2023 मध्ये 392 जणांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली. तसेच, आरपीएफच्या जवानांनी 42.28 लाख रुपयांची आगामी काळातील तिकिटे जप्त केली.
मोहीम “नार्कॉस” – अंमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांशी लढा:
● या मोहिमेअंतर्गत अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करत नोव्हेंबर 2023 मध्ये आरपीएफने 91 व्यक्तींना अटक केली आणि 3.69 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले.
प्रवाशांच्या समस्यांना जलद प्रतिसाद:
● नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे प्रवाशांनी नोंदवलेल्या 21,800 हून अधिक तक्रारींना प्रतिसाद देत, आरपीएफने या तक्रारी सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
मोहीम “यात्री सुरक्षा” – प्रवाशांचे संरक्षण:
● नोव्हेंबर2023 मध्ये आरपीएफने प्रवाशांविरुद्धच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 229 गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांना पुढील कारवाईसाठी संबंधित जीआरपी/पोलीस दलाच्या ताब्यात दिले.
“संरक्षा मोहिमे”च्या माध्यमातून सुरक्षिततेची सुनिश्चिती:
● आरपीएफने चालत्या रेल्वे गाड्यांवर दगड भिरकावण्याची धोकादायक कृती करणाऱ्या 28 जणांना नोव्हेंबर 2023 मध्ये अटक केली.
गरजू प्रवाशांना मदत (मोहीम सेवा):
● नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान आरपीएफने 191 वयोवृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना आवश्यक मदत पुरवली.
बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला अटकाव (मोहीम सतर्क):
● आरपीएफने बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेली 10,54,630 रुपये मूल्याची तंबाखू उत्पादने आणि मद्य जप्त केले आणि या वाहतुकीशी संबंधित 67 जणांना ताब्यात घेऊन संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द केले.


