कोरोना सारख्या संभाव्य साथरोगांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक निधी उभारण्याचा निर्णय जी20 च्या देशातील आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी जागतिक बँकेने पहिल्या टप्प्यामध्ये 30 कोटी डॉलरची तरतूद केली असून या निधीचा विस्तार करण्यावर जी20 देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहमती झाली. जागतिक बँकेचा 30 कोटी डॉलरचा निधी प्रामुख्याने जी20 देशच नव्हे तर अन्य विकसनशील देशांतील साथरोगाच्या नमुना चाचण्या, सर्वेक्षण- देखरेख व आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ विकासासाठी खर्च केले जाणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासह लसी व औषधांच्या पुरवठ्यावरील भर देण्यात येणार आहे.
बालकांच्या लसीकरणासाठी ‘यू- विन’ प्रकल्प:
देशातील 13 वर्षांपर्यंतच्या बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ‘यू-विन’ प्रकल्प राबवला जाणार आहे. कोरोना लसीकरणासाठीच्या ‘को-विन’ प्रमाणेच हे नवीन ‘यू-विन’ ॲप कार्यरत राहील. या ॲपच्या आधारे देशातील सर्व बालकांच्या लसीकरणाचे लक्ष गाठले जाईल. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर चालवला जात असून लवकरच देशभर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या ॲपवर प्रत्येक बालकाच्या लसीकरणाची नोंदणी असेल.


