एक देश एक निवडणूक विधयेक लोकसभेत सादर
- लोकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यासाठीचे ‘एक देश, एक निवडणूक’ हे महत्त्वाकांक्षी विधेयक 17 डिसेंबर रोजी लोकसभेत सादर करण्यात आले.
- हे 129 वे घटना दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्याचा निर्णय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी जाहीर केला.
- या समितीची रचना लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. यावर मतविभाजन घेण्यात आले. नवीन संसद भवनात प्रथमच इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे केलेल्या मतविभाजनाचा प्रस्ताव सरकारने साधारण बहुमताने जिंकला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली होती त्याआधी सप्टेंबर मध्ये या विधेयकाबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती
स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अरुणा ढेरे
- हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे.
- पुणे येथील टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृह येथे 21 डिसेंबर पासून तीन दिवस हे संमेलन होणार आहे.
- रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांच्या हस्ते 21 डिसेंबर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.