तमीळ अभिनेता विजय याने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याने ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) हा पक्ष स्थापन केला आहे. याचा अर्थ ‘तमिळनाडू विजयी पक्ष’ असा होतो. तमिळनाडूमध्ये 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात तो उतरण्याची शक्यता आहे.
‘विजय मक्कल इयक्कम’ (विजय पीपल्स मूव्हमेंट) यांच्या त्याच्या चाहत्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे नवीन पक्षाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर विजयने आज नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली.
जनतेची सेवा करण्याच्या एकमेव उद्देशाने स्वच्छ राजकारण करण्याची विजयने इच्छा व्यक्त केली.
अभिनेता ते नेत्यांची परंपरा…
● अभिनेता ते नेता असा प्रवेश करण्याची मोठी परंपरा तमिळनाडूत आहे.
● तमिळनाडू चित्रपटसृष्टीने राज्याला पाच मुख्यमंत्री दिले आहेत.
● सी. एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन उर्फ एमजीआर, जे. जयललिता आणि व्ही. एन. जानकी (एमजीआर यांच्या पत्नी) यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे.
● विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही अभिनेता म्हणून दूरचित्रवाणीवर काही काळ काम केले आहे.
● याशिवाय रजनीकांत यांनीही राजकारणात प्रवेश केला होता, तसेच कमल हसन यांचाही स्वतःचा राजकीय पक्ष आहे.