भारताच्या ‘आदित्य एल 1’ यान सौर वेध शाळेला प्रक्षेपणापासून 126 दिवसांनी ‘लैंग्रेज पॉईंट 1’ भोवतीच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला यश आले. अमेरिका आणि युरोपची संयुक्त मोहीम असलेल्या ‘सोहो’ या वेधशाळेनंतर सूर्याच्या अभ्यासासाठी ‘एल1’ बिंदूवर पाठवण्यात आलेली ‘आदित्य एल 1’ ही जगातील दुसरीच मोहीम आहे. यातून सूर्यविषयीची अज्ञात तथ्ये उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल.
अधिक माहिती
● सहा महिन्यांच्या कालावधीत चंद्रयान-3, ‘एक्सपोसॅट’ पाठोपाठ आता ‘आदित्य एल1’ मोहिमेला हे मोठे यश मिळाल्यामुळे भारतीय खगोल संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.
● 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी यानाचे नियंत्रक इंजिन अल्पावधीसाठी सुरू करण्यात आले.
● या प्रक्रियेतून आदित्य यानाला दुपारी चारच्या सुमारास पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘एल1’ बिंदूभोवतीची त्रिमितीय ‘हॅलो कक्षा’ प्राप्त झाली.
● या कक्षेतून यान सूर्याभोवती फिरतानाच ‘एल1’ बिंदूभोवती सुमारे 178 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करेल .
● पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या काल्पनिक रेषेवर ‘एल1’ बिंदू असल्याने पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणा दरम्यान त्याच्या स्थानात थोडा बदल होतो.
● या बदलाला अनुसरून मोहिमेच्या कार्यकाळात आदित्य ‘एल1’च्या कक्षेत नियमितपणे सुधार करावा लागणार आहे.
● श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य ‘एल1’ या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
लँग्रेज पॉईंट म्हणजे काय?
● जोसेफ लुईस लँग्रेज या फ्रेंच इटालियन गणितज्ञाने 1772 मध्ये सर्वप्रथम अवकाशातील तीन घटकांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न सोडवला.
● अवकाशातील दोन मोठ्या वस्तूमानाच्या घटकांचे गुरुत्वाकर्षण पाच बिंदूवर सम समान असते असे लँग्रेजने दाखवून दिले .त्यांनाच एल1 आणि एल2 अशी नावे देण्यात आली.
● या बिंदूवर लहान वस्तू आली असता मोठ्या घटकांच्या गुरुत्वीय घटकांच्या प्रभावांमध्ये ती लहान वस्तू अवकाशातून विशिष्ट कक्षेतून संचार करते.
● पृथ्वी आणि सूर्य या दोन मोठ्या वस्तूमानाच्या घटकांचे उदाहरण घेतल्यास सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या सरळ रेषेत सूर्यापलीकडे एल 3, सूर्य आणि पृथ्वीदरम्यान, पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर ‘एल 1’ पृथ्वीच्या पलीकडे 15 लाख किलोमीटरवर ‘एल 2′ असे बिंदू येतात. तर ,’एल 4’ आणि ‘एल 5’ हे बिंदू पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेवर दोन्ही घटकापासून समान अंतरावर असतात.
मोहिमेतील महत्त्वाचे टप्पे
● प्रक्षेपण ते एल1 प्रवासाचा कालावधी 126 दिवस
● प्रक्षेपण: 2 सप्टेंबर 2023
● 3 ते 15 सप्टेंबर: पृथ्वीभोवतीची कक्षा विस्तार
● 19 सप्टेंबर : यान पृथ्वीच्या कक्षेतून एल1 बिंदूकडे मार्गस्थ
● 7 नोव्हेंबर : यानावरील हाय एनर्जी एल1 ऑर्बिट एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने सौरज्वाळांची प्रथमच नोंद घेतली.
● 20 नोव्हेंबर: आयुकाने विकसित केलेले सोलार अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप हे वैज्ञानिक उपकरण सक्रिय
● 8 डिसेंबर :’सूट’ या टेलिस्कोपने टिपलेल्या अल्ट्रा व्हायोलेट लहरींमधील सूर्याच्या पहिल्या प्रतिमा प्रसिद्ध
● 6 जानेवारी: आदित्य यान एल1 बिंदू भोवतीच्या कक्षेत दाखल.