(‘आयएमडी’चे 150 व्या वर्षात पदार्पण)
देशाच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना वेळेत हवामान अंदाज मिळावेत यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) ‘पंचायत मौसम सेवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
‘आयएमडी’ च्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिल्ली येथे कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंचायत मौसम सेवेसह ‘आयएमडी’च्या डिसीजन सपोर्ट सिस्टीम, मौसम या मोबाइल अॅप्लिकेशनची अद्ययावत आवृत्ती, नॅशनल फ्रेमवर्क ऑफ क्लायमेट सर्व्हिसेसचेही उद्घाटन केले.
अधिक माहिती
● कार्यक्रमाला पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रिजिजू, मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते. दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासोबत ‘आयएमडी’च्या देशभरातील सर्व केंद्रांवर संस्थेच्या 149व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
● काही वर्षांत गावपातळीवरील हवामान अंदाज देण्याचा ‘आयएमडी’चा संकल्प आहे.
● त्याचीच पहिली पायरी म्हणून पृथ्वी विज्ञान आणि पंचायत राज मंत्रालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचायत मौसम’ सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
● देशातील सर्व राज्यांसाठी तालुका पातळीवरील हवामानाचा एका आठवड्याचा हवामान अंदाज वेबसाइट आणि मोबाइल अॅप्लिकेशनच्या साह्याने देण्यात येत आहे.
● या अंदाजामध्ये तापमान, आर्द्रता, पाऊस यांचा अंदाज असून, त्यासोबत विविध पिकांसाठीच्या सूचनाही देण्यात येत आहेत.
‘पाच वर्षांत देशात 86 रडार’
● देशातील हवामान सेवेत दहा वर्षांत मोठे बदल घडले असून, पुढील पाच वर्षांत ‘आयएमडी’च्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याचे रिजिजू यांनी सांगितले.
● ‘2014 मध्ये देशात 15 रडार होते. आता रडारची संख्या 39 झाली असून, पुढील पाच वर्षांत देशात एकूण 86 रडार बसवण्यात येणार आहेत.
● 2014 मध्ये पर्जन्यमापकांची संख्या 3955 होती. ती 2023 मध्ये 6095 इतकी झाली आहे.
● पृथ्वी या योजनेमुळे येत्या काळात हवामानशास्त्रीय सेवांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.