अमेरिकी कंपनी इंटूइटिव्ह मशिन्सने विकसित केलेले ओडीसियस हे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात भारतीय प्रमाणवेळेनुसार 23 फेब्रुवारी रोजी पहाटे अलगद उतरले. ओडीसियसच्या रूपाने खासगी कंपनीने बनवलेले यान प्रथमच चंद्रावर उतरले असून, अपोलो मोहिमांनंतर पाच दशकांनी अमेरिकेचे चंद्राच्या पृष्ठभागावर आगमन झाले. भारताच्या चांद्रयान-3 नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा अमेरिका हा दुसरा देश ठरला.
मोहिमेविषयी…
● आगामी 2026 पर्यंत अमेरिकी नागरिकांना पुन्हा चंद्रावर पाठवण्यासाठी ‘नासा’तर्फे ‘आटेमिस’ मोहिमेची तयारी सुरू आहे.
● चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ माणसांना उतरवण्याआधी त्या भागाचा अभ्यास करण्यासाठी खासगी कंपन्यांच्या सहभागातून अवकाश मोहिमा पाठवण्यात येत आहेत.
● या आधी अॅस्ट्रोबोटिक्स टेक्नॉलॉजीने विकसित केलेली पियरग्राइन मोहीम प्रक्षेपणानंतर इंधन यंत्रणेत आलेल्या बिघाडामुळे अयशस्वी ठरली होती.
● ओडीसियसच्या यशामुळे 1972 नंतर प्रथमच अमेरिकी यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.
● त्यानंतरच्या काळात सोव्हिएत युनियन, चीन, भारत आणि नुकतेच जपानने चंद्रावर आपली याने उतरवली आहेत.
● आगामी ‘आर्टेमिस’ ही मानवी मोहीम प्रत्यक्षात आणण्यासाठी अमेरिकेला चंद्राच्या जमिनीचा नव्याने अभ्यास करण्याची आवश्यकता भासत आहे.
1900 किलो वजनाचे यान..
● 1900 किलो वजनाचे यान ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या फाल्कन रॉकेटच्या साह्याने 15 फेब्रुवारीला ओडीसियसचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
● 1900 किलो वजनाच्या या यानावर ‘नासा’च्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेली सहा वैज्ञानिक उपकरणे, कलाकृती, चंद्राशी संबंधित पुस्तकांचा डिजिटल कोष आदींचा समावेश आहे.
● ‘नासा’च्या कमर्शिअल लुनार पेलोड सर्व्हिसेस या योजनेअंतर्गत झालेल्या करारानुसार इंटूइटिव्ह मशिन्सने ओडीसियस यानाची निर्मिती केली.
● चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावर उतरल्यामुळे यानाला वैज्ञानिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी फक्त आठवडाभराचा कालावधी मिळणार आहे.