भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेची तारीख निश्चित झाली असून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी एलव्हीएम -3 या प्रक्षेपण यानातून हे या चंद्राकडे झेपावेल. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण तळावरून चांद्रयान -3 चे उड्डाण होईल. चांद्रयानाच्या सर्व चाचण्या झाल्या असून ‘लाँच व्हेईकल मार्क थ्री’ या प्रक्षेपण यानावर ते सिद्ध करण्यात आले आहे. चांद्रयान -3 मोहिमेचे दोन प्रमुख भाग असतील. ‘ चंद्राचे विज्ञान'(सायन्स ऑफ द मून) या अंतर्गत चंद्राची आवरणशीला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण तसेच लँडिंग स्थळाच्या आसपास असलेल्या चांद्रपृष्ठतील रासायनिक मूलद्रव्य यांचा अभ्यास केला जाणार आहे. तर ‘चंद्रावरून विज्ञान'( सायन्स फ्रॉम द मून) याद्वारे चंद्राच्या कक्षेमधून पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे. 23 किंवा 24 ऑगस्टला चांद्रपृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल. चंद्रावर 14 ते 15 दिवस सूर्यप्रकाश तर 14- 15 दिवस अंधार असतो आणि लँडिंग साठी सूर्यप्रकाश असणे आवश्यक असल्यामुळे त्याचा अंदाज घेऊन विक्रम उतरवले जाईल अशी माहिती मोहिमेतील संशोधकांनी दिली.
चांद्रयान – 3 मोहिमेविषयी:
अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने विविध मोहिमा आखल्या आहेत. पहिले चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर भारताने दुसरी चांद्रयान मोहीम राबविले मात्र तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी ही मोहीम अयशस्वी झाली. 22 जुलै 2019 रोजी प्रेक्षेपित केलेली चांद्रयान – 2 मोहीम 6 सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लॅन्डर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नियोजित चांद्रयान -3 मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 5 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 अंतराळयानाला व्हेईकल मार्क- 3 या प्रक्षेपण यानासह यशस्वीरित्या एकत्रित केल्याची घोषणा केली. चांद्रयान- 3 या यानात लॅन्डर, रोव्हर आणि प्रॉपलशन मॉड्युल आहे हे स्वतःहून अंतराळात जाऊ शकत नाही त्यास ‘एलव्हीएम – 3’ सारख्या प्रक्षेपण यानाद्वारेच हे यान अंतराळात झेपावू शकते . एलव्हीएम- 3 या प्रक्षेपण यानात शक्तिशाली प्रणोदन प्रणाली असते जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून उपग्रहासारख्या अवजड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकते. व्हेईकल मार्क-3 हे प्रक्षेपण यान शक्तिशाली असून चांद्रयान -3 अवकाशात सोडण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.
एलव्हीएम-3 :


