वन तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्चला पवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राज्य शासनाने या पुरस्कार निवडीचा शासन निर्णय जाहीर करून चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा केली.
चैत्राम पवार
● धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाडयाची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण 1992 नंतर हे चित्र पार बदललं आहे. गावात मोठ्या उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले व त्यांना गावातल्या आदिवासी मावळयांनी साथ दिली. या लोकचळवळीची दखल जगाने घेतली.जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक पटकावला.
● त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे.
● वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने चैत्राम पवार यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरी
● चैत्राम पवार व गावकऱ्यांच्या श्रमदानातून व दैदिप्यमान शक्तीमधून उभे राहिलेल्या बारीपाडा या आदिवासी पाडयाची यशोगाथा आहे. म्हणून चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
● राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्षलागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे कौतुक केले आहे.


