भारतीय लोकशाहीच्या मजबुतीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या अनेक खटल्यांमध्ये योगदान देणारे प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील फली सॅम नरिमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. भारतीय न्यायव्यवस्थेतील ‘पितामह’ अशी त्यांची ओळख होती.
भारतीय न्यायव्यवस्थेतील ‘पितामह’ समजल्या जाणाऱ्या फली नरिमन यांची वकिलीची कारकीर्द प्रभावी होती.
अधिक माहिती
● आपल्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी भोपाळ वायुगळती शोकांतिका, शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता बहाल करणारा टीएमए पै फाऊंडेशन विरुद्ध कर्नाटक सरकार, जयललिता यांचे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, केशवानंद भारती खटला, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगा’सह अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये युक्तिवाद केला होता.
● नरिमन यांचा जन्म 10 जानेवारी 1929 रोजी रंगून येथे एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबात झाला.
● जपानने 1942 मध्ये म्यानमारवर आक्रमण केल्यानंतर त्यांचे कुटुंब आश्रयासाठी भारतात आले. त्या वेळी नरिमन यांचे वय 12 वर्ष होते.
● नोव्हेंबर 1950 मध्ये नरिमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
● 1961 मध्ये वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 70 वर्षांहून अधिक काळ वकिली केली.
● नरिमन यांना 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
● एक लेखक म्हणूनही नरिमन यांचा लौकिक होता.
● ‘बिफोर मेमरी फेड्स’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ भारतातील उदयोन्मुख वकिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शकच ठरला आहे.
● त्यांनी ‘द स्टेट ऑफ द नेशन’, ‘इंडियाज लीगल सिस्टम : कॅन इट बी सेव्हड् ?’ आणि ‘गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट’ हे ग्रंथही लिहिले आहेत.