● झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे मूत्रपिंडाच्या विकाराने वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.
● सोरेन यांनी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री पद सांभाळले. आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा नेता अशी त्यांची ओळख होती.
● झारखंडमध्ये ते ‘गुरुजी’ या नावाने सर्वसामान्यांमध्ये ओळखले जात.
● वेगळ्या झारखंड राज्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या मागणीला 2000 मध्ये यश आले. राज्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
अल्प परिचय:
● 11 जानेवारी 1944 रोजी रामगड जिल्ह्यातील नेमरा गावात (तत्कालीन बिहारमध्ये, आता झारखंडमध्ये) जन्मलेले शिबू सोरेन ‘दिशोम गुरू’ अर्थात एका विशिष्ट समुदायाचे नेते आणि मातृभूमीचे नेते म्हणून ओळखले जात.
● ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ पक्षासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
● आदिवासी क्षेत्र आणि प्रादेशिक राजकारणातील दीर्घकाळ टिकून राहिलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.
● त्यांचे राजकीय जीवन सतत आदिवासी हक्कांसाठी लढणारे राहिले.
● सोरेन यांचे बालपण दुःख आणि तीव्र सामाजिक-आर्थिक संघर्षांनी भरलेले होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
● शिबू सोरेन यांचे वडील शोभारण सोरेन यांची २७ नोव्हेंबर १९५७ रोजी लुकैयातंड जंगलात सावकारांनी हत्या केली. त्यावेळी शिबू फक्त १३ वर्षांचे होते. या घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला आणि राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचे त्यांनी निश्चित केले.
● १९७३ मध्ये सोरेन यांनी बंगाली मार्क्सवादी ट्रेड युनियन नेते ए. के. रॉय आणि कुर्मी-महतो नेते बिनोद बिहारी महतो यांच्यासोबत धनबाद येथील गोल्फ ग्राउंडवर झालेल्या सार्वजनिक सभेत झारखंड मुक्ती मोर्चाची (जेएमएम) स्थापना केली.
● छोटा नागपूर आणि संथाळ परगणा प्रदेशातील लोकांच्या समर्थनामुळे लवकरच ‘जेएमएम’ हे स्वतंत्र आदिवासी राज्याच्या मागणीसाठी प्रमुख राजकीय व्यासपीठ बनले.
● त्यांच्या आणि इतर नेत्यांच्या दशकांनंतरच्या आंदोलनानंतर १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची निर्मिती झाली आणि स्वतंत्र राज्याची मागणी पूर्ण झाली.
दीर्घकाळ खासदार
● शिबू सोरेन यांचा प्रभाव केवळ राज्याच्या राजकारणापुरता मर्यादित नव्हता. १९७० च्या दशकात शिबू सोरेन राजकारणात आले.
● १९७५ मध्ये त्यांनी बिगर आदिवासी लोकांसाठीही आंदोलन केले. या आंदोलनात सात जणांचा मृत्यू झाला.
● १९७७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. मात्र, ही निवडणूक ते हरले.
● त्यानंतर १९८० मध्ये ते लोकसभेत खासदार झाले. यानंतर १९८९, १९९१ आणि १९९६ या वर्षांमध्ये शिबू सोरेन लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले.
● २००२ मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि दुमका मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत विजय मिळवला.
● २००६ मध्ये शिब सोरेन हे केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री झाले.
मुख्यमंत्रिपदाचे तीन कार्यकाळ
● मार्च २००५ मध्ये फक्त १० दिवसांसाठी, २ मार्च ते ११ मार्च; २७ ऑगस्ट २००८ ते १२ जानेवारी २००९ आणि ३० डिसेंबर २००९ ते ३१ मे २०१० पर्यंत अशा तीन कार्यकाळांमध्ये शिबू सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होते.
● राज्यातील अस्थिर आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रत्येक कारकिर्दीचा कालावधी अल्पकालीन ठरला.
● जून २००७मध्ये सोरेन यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता. देवघर जिल्ह्यातील दुमरिया गावाजवळ त्यांच्या ताफ्यावर बॉम्बफेक करण्यात आली होती.
● झारखंडमध्ये त्यांचा असलेला चाहतावर्ग आणि पक्षाच्या माध्यमातून झारखंडच्या राजकारणातील त्यांचे वर्चस्व कायम राहिले.
● सोरेन एप्रिल २०२५ पर्यंत ३८ वर्षे जेएमएमचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचा मुलगा हेमंत हे पक्षाचे नवे अध्यक्ष झाले असून, सध्या ते मुख्यमंत्रिपदावर आहेत.