- पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समधील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी सूर्यापेक्षा दहा पटींनी कमी वस्तुमानाच्या ताऱ्याला नष्ट करणाऱ्या ‘पल्सार’ची दुर्मीळ घटना समोर आणली आहे.
- अमेरिका आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांसोबत केलेल्या या संशोधनासाठी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) नोंदींचा वापर करण्यात आला आहे.
पल्सार म्हणजे काय?
- ‘पल्सार’ हा आकाराने लहान, अतिशय घन आणि अधिक वयाचा न्यूट्रॉन तारा असून, तो अत्यंत वेगाने स्वतःभोवती फिरत असतो.
- या ताऱ्यामधून उत्सर्जित होणारे रेडिओ संदेश पृथ्वीवर विशिष्ट कालावधीने नोंदले जात असल्यामुळे त्याला ‘पल्सार’ म्हणतात.
- काही पल्सार एका सेकंदामध्ये शेकडो वेळा स्वतःभोवती फिरतात, अशांना ‘मिलिसेकंद पल्सार’ म्हणतात.
- 2016 मध्ये ‘एनसीआरए’मधील प्रा. भासवती भट्टाचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जीएमआरटी’च्या नोंदींच्या साह्याने ‘जे 1242-4712’ या मिलिसेकंदचा शोध लावला होता.
सूक्ष्म बदल टिपला
- संस्थेतील पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या अंकिता घोषच्या पुढाकाराने झालेल्या संशोधनातून खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने ‘जे 1242-4712’ या ‘पल्सार’च्या क्षेत्रातील घडामोडी समोर आणल्या आहेत.
- ‘एनसीआरए’ने दिलेल्या माहितीनुसार, अद्ययावत जीएमआरटीच्या साह्याने शास्त्रज्ञांनी 400 आणि 650 मेगाहर्टझ फ्रीक्वेन्सीवर या ‘पल्सार’च्या4 मायक्रोसेकंदच्या अचूकतेने नोंदी घेतल्या.
- या नोंदींमधून ‘पल्सार’च्या संदेशांमध्ये होणारा सूक्ष्म बदल टिपण्यात आला.
वस्तुमानाचा ऱ्हास
- जे 1242-4712’ पल्सारला आपल्या सूर्यापेक्षा दहा पटींनी कमी वजन असलेला जोडीदार असून, हे दोन्ही तारे एकमेकांभोवती7 तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतात.
- या काळात काही वेळा या जोडीकडून येणाऱ्या संदेशांची तीव्रता कमी होते.
- ‘पल्सार’कडून मुक्त होणाऱ्या तीव्र ऊर्जेमुळे त्याच्या जोडीदार ताऱ्याच्या वस्तुमानाचा ऱ्हास होत असून, एक प्रकारे ‘पल्सार’ त्याच्या जोडीदाराला नष्ट करत आहे.
- जोडीदार ताऱ्यातून बाहेर पडलेल्या वस्तुमानामुळे ‘पल्सार’कडून येणाऱ्या रेडिओ संदेशांची तीव्रता कमी होते, असे या संशोधनातून समोर आले आहे.
- हे संशोधन ‘ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.