रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी (वय ४७) यांचा अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या तुरुंगातच मृत्यू झाला. नवाल्नी यांनी 2010 मध्ये पुतीन यांच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केले. यानंतर रशियाच्या सरकारकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. सध्या ते फसवणूक आणि बंडखोरीच्या आरोपाखाली सुमारे 19 वर्षांची शिक्षा भोगत होते. अनेक काळापासून ते आर्टिक प्रदेशानजीक असलेल्या रशियाच्या भागातील तुरुंगात होते.
भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराविरुद्ध लढा…
● 2011 मध्ये त्यांनी पुतीन यांच्या पक्षावर अलेक्सी नवाल्नी यांनी पहिल्यांदा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. संसदीय निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोपही नवाल्नी यांनी केला होता.
● 2011 मध्ये त्यांनी पुतीन यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात तीन हजार जणांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली. या वेळी पुतीन सरकारने नवाल्नी आणि त्यांची पत्नी युलिया यांनादेखील अटक केली होती.
नवाल्नी यांच्यावर झाला होता विषप्रयोग
● रशियाच्या एफएसबी सुरक्षा सेवेने 2020 मध्ये ‘नोव्हिचोक’या घातक पदार्थाचा वापर करत नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे नवाल्नी कोमात गेले.
● त्यांना उपचारासाठी जर्मनीत नेण्यात आले. तेथे ते बरे झाले आणि 2021 मध्ये रशियात परतले. त्यांना पॅरोल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगाच्या नियमानुसार 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.