पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार (नॅशनल क्रिएटर अवॉर्ड) प्रदान केला. राष्ट्रीय सृजक पुरस्कार हा कथाकथन, सामाजिक बदलाचे समर्थन , पर्यावरणीय स्थैर्य , शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टता आणि प्रभाव यांचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक मंच म्हणून या पुरस्काराची कल्पना पुढे आली .
पार्श्वभूमी
• नॅशनल क्रिएटर अवॉर्ड (राष्ट्रीय सर्जक पुरस्कार) ला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.
• पहिल्या फेरीत विविध 20 श्रेणींमध्ये 1.5 लाखांहून अधिक नामांकने प्राप्त झाली. त्यानंतरच्या मतदान फेरीत विविध पुरस्कार श्रेणींमध्ये डिजिटल निर्मात्यांना सुमारे 10 लाख मते पडली.
• यानंतर तीन आंतरराष्ट्रीय निर्मात्यांसह 23 विजेते निश्चित करण्यात आले. हा इतका सहभाग लक्षात घेतला तर या पुरस्कारात खरोखरच लोकांच्या निवडीचे प्रतिबिंब उमटते असे म्हणता येईल.
• सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कारासह वीस श्रेण्यांमध्ये हा पुरस्कार दिला जातो.
• त्या त्या वर्षात डिसरप्टर ऑफ द इअर; सेलिब्रिटी क्रिएटर; ग्रीन चॅम्पियन; सामाजिक बदलासाठी सर्वोत्तम निर्माता; सर्वात प्रभावशाली कृषी निर्माता; सांस्कृतिक राजदूत; आंतरराष्ट्रीय निर्माता; सर्वोत्कृष्ट प्रवास निर्माता; स्वच्छता दूत; न्यू इंडिया चॅम्पियन; टेक क्रिएटर; हेरिटेज फॅशन आयकॉन; सर्वाधिक सर्जनशील निर्माता (पुरुष आणि महिला); अन्न श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता; शिक्षण श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता; गेमिंग श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता; सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर; सर्वोत्कृष्ट नॅनो निर्माता; सर्वोत्तम आरोग्य आणि फिटनेस निर्माता असे पुरस्कार दिले जातात.