दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातीले यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. कोरोना महासाथीनंतर ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे. ब्राझील, रशिया, भारत ,चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा ब्रिक्स गटात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित न राहता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी आफ्रिका खंडातील आणि पश्चिम आशियातील 20 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे.
परिषदेत खालील मुद्द्यांवर होणार चर्चा:-
- ब्रिक्सच्या विस्तारीकरणावर चर्चा
- आर्थिक सहकार्य वाढविण्यावर भर
- आरोग्य, शिक्षण आणि हवामानातील बदल यावर एकत्रित काम करण्यावर चर्चा होणार
- विकसनशील देशांच्या अन्नसुरक्षेवर चर्चा होण्याची शक्यता
जगात ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांचे स्थान:
‘ब्रिक्स’ गटामधील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये जगातील 41 टक्के लोकसंख्या राहते. या पाच देशांचा जागतिक जीडीपीचा वाटा 24% आहे. तसेच या पाच देशांमध्ये होणारा व्यापार हा जागतिक व्यापाराच्या 16% आहे.


