भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिरुअनंतपुरम येथे जाहीर करण्यात आली. हवाई दलातील ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांची गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांपैकी तिघांना पुढील वर्षी प्रत्यक्ष अंतराळ प्रवास करता येईल.
अधिक माहिती
● पंतप्रधान मोदी यांनी विक्रम साराभाई अवकाश केंद्राला (व्हीएसएससी) भेट देऊन गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
● मोदी यांच्या हस्ते चौघा नियोजित अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट विंग्स’ प्रदान करण्यात आले.
● नायर, कृष्णन, प्रताप आणि शुक्ला यांना हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या चाचणीचा अनुभव असल्यामुळे आपत्कालीन स्थितीशी सामना करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे.
● या वैमानिकांनी फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 या कालावधीत रशियातील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर येथे अवकाश प्रवासासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले.
● याच केंद्रामध्ये भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांनी प्रशिक्षण घेतले होते.
● भारतात परतल्यापासून चारही वैमानिकांना मोहिमेसाठी आवश्यक प्रगत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
● भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारानुसार 2024 मध्ये चार पैकी एक किंवा दोन अंतराळवीरांना अमेरिकी मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी मिळू शकते.
असा असेल प्रवास…
● गगनयान मोहिमेच्या मानवरहित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मानवी मोहिमेतून चार पैकी तिघा अंतराळवीरांना जमिनीपासून 400 किलोमीटरच्या कक्षेत पोचवण्यात येईल.
● तीन दिवस या कक्षेत प्रयोग केल्यानंतर तिघा अंतराळवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्यात येईल.
● गगनयान मोहिमेची शृंखला त्यापुढेही सुरू राहणार असून, 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती करणे आणि 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे ‘इस्रो’चे लक्ष्य आहे.
चार अंतराळाविषयी थोडक्यात माहिती…
1. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर
o मूळचे केरळमधील तिरुवाझियाड येथील.
o एनडीएमधील प्रशिक्षणात मानाची तलवार पटकावली होती.
o 1998 मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल.
o 3000 तासांहून अधिक काळ विविध विमानांतून उड्डाण.
o ‘सुखोई 30’च्या तुकडीचे नेतृत्व.
o ‘अ’ श्रेणीतील उड्डाण प्रशिक्षक व चाचणी वैमानिक.
2. ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
o मूळचे चेन्नईचे.
o एनडीएमधील प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रपतींचे सुवर्णपदक आणि हवाई दल प्रबोधिनीत मानाची तलवार पटकावली.
o 2003 मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात.
o विविध विमानांवर 2900 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव.
o हवाई दलात उड्डाण प्रशिक्षक व चाचणी वैमानिक.
3. ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
o मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे.
o एनडीएचे माजी छात्र.
o 2004 मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात.
o विविध विमानांवर 2000 तासांहून अधिक काळ उड्डाण.
o हवाई दलात उड्डाण प्रशिक्षक व चाचणी अधिकारी.
4. विंग कमांडर शुभांशू शुक्ला
o मूळचे लखनौचे.
o एनडीएचे माजी छात्र.
o 2006 मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात.
o लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्व. तसेच चाचणी वैमानिक.
o विविध प्रकारच्या विमानोड्डाणाचा 2000 तासांहून अधिकचा अनुभव.


