मुलामुलींना आणि तरुणांना अवकाश आणि विश्वाबद्दल आकर्षण असते. ते खूप जिज्ञासू आहेत आणि त्यांची सर्व खगोलीय घटनांबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा आहे. तरुण मनांच्या या उत्कट कुतूहलाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शालेय मुलांसाठी “यंग सायंटिस्ट प्रोग्राम” अर्थात “युवा वैज्ञानिक कार्यक्रम” (युविका) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अधिक माहिती
● या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञानआणि सध्याच्या काळात अवकाश अभ्यासाविषयी उपयोगात येणारे आधुनिक मूलभूत ज्ञान प्रदान करणे हा आहे.
● इस्रोने “तरुणांना केंद्रस्थानी ठेवून” हा कार्यक्रम तयार केला आहे.
● युविका कार्यक्रमामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) आधारित संशोधन आणि त्या अनुषंगिक अभ्यासक्रमामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
● देशातील ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञान आणि अवकाश अभ्यासक्रमाशी निगडित तंत्राविषयी मूलभूत ज्ञान मिळावे ही यंग सायंटिस्ट प्रोग्राम – युविका कार्यक्रमाची संकल्पना आहे.
● अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन प्रगत कल समजण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
● या कार्यक्रमात दोन आठवड्यांचे वर्ग प्रशिक्षण, प्रयोगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, कॅनसॅटवर तंत्रज्ञानाविषयी माहिती, रोबोटिक किट, इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मॉडेल रॉकेट्री संवाद आणि क्षेत्रिय भेटी यांचा समावेश आहे.
● हा कार्यक्रम 2019, 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे 111, 153 आणि 337 विद्यार्थ्यांच्या सहभागाने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता, जो भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतो.
● यावेळी विद्यार्थ्यांना भौगोलिक स्थानानुसार पाच तुकड्यांमध्ये विभागले गेले आणि त्यांना व्हीएसएससी (VSSC), युआरएससी (URSC), एसएसी (SAC), एनआरएससी (NRSC), एनइएसएसी (NESAC), एसडीएससी (SDSC), एसएचएआर (SHAR) आणि आयआयआरएस (IIRS) येथे प्रशिक्षण देण्यात आले.
● इस्रोला युविका – 2023 कार्यक्रमासाठी जबरदस्त प्रतिसाद मिळाला, भारताच्या कानाकोपऱ्यातून 1.25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी युविका – 2023 साठी नोंदणी केली होती. शेवटची परीक्षा, सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
● या प्रशिक्षण कालावधीमध्ये वर्ग प्रशिक्षण, रोबोटिक्स क्षेत्रातले आव्हाने, डीआयवाय (DIY) असेंब्ली ऑफ रॉकेट/सॅटेलाइट, स्काय गेझिंग इ. तांत्रिक सुविधा भेटी आणि अंतराळ शास्त्रज्ञांशी संवाद यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.