राजस्थानातील ‘पोखरण फील्ड फायरिंग रेंज’ येथे तिन्ही संरक्षण दलांचा ‘भारत शक्ती’ हा समन्वयित सराव आयोजित करण्यात आला होता. हा सराव सुमारे 50 मिनिटे चालला. स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादने- उपकरणांची प्रात्यक्षिके करण्यात आली.
अधिक माहिती
• जैसलमेर शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर हा सराव आयोजित करण्यात आला होता.
• स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान ‘तेजस’ने गर्जना करत आकाशभरारी मारली आणि प्रगत तंत्रज्ञानयुक्त हलके हेलिकॉप्टर ‘एमके-4’ने उड्डाण करत आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. तर मुख्य लढाऊ रणगाडे ‘अर्जुन’ आणि ‘के-9’ वज्र, धनुष आणि सारंग यांच्या तोफखाना यंत्रणांनी जमिनीवर मारा करून आपली ताकद अधोरेखित केली.
पार्श्वभूमी
• भारत शक्ती जमीन, हवाई, सागरी सायबर आणि अंतराळ क्षेत्रातील धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांच्या एकात्मिक परिचालन क्षमता प्रदर्शित करणाऱ्या वास्तववादी, समन्वयित, बहु-क्षेत्रीय परिचालनाला बळ देईल.
• सरावात भाग घेणारी प्रमुख उपकरणे आणि शस्त्र प्रणालीमध्ये, T-90 (IM) रणगाडे, धनुष आणि सारंग गन सिस्टीम, आकाश वेपन्स सिस्टम, लॉजिस्टिक ड्रोन, रोबोटिक मुल्स, आधुनिक हलके हेलिकॉप्टर (ALH) आणि मानवरहित हवाई वाहनांची एक श्रेणी, यासह इतर सामुग्रीचा समावेश आहे. ज्याद्वारे, भारतीय लष्कराची जमिनीवरील प्रगत युद्ध आणि हवाई देखरेख क्षमता प्रदर्शित होत आहे.
• भारतीय नौदलाने नौदलाची जहाज-रोधक क्षेपणास्त्रे, स्वयंचलित मालवाहतूक करणारी हवाई वाहने आणि हवाई लक्ष्य साधणारी यंत्रणा, याद्वारे देशाचे सागरी सामर्थ्य आणि आधुनिक तंत्र कुशलता प्रदर्शित केली.
• भारतीय वायुसेनेने स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजस, हलके युटिलिटी हेलिकॉप्टर आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर तैनात केले, जे हवाई कारवाईमधील देशाची श्रेष्ठता आणि अष्टपैलुत्व सिद्ध करते.
देशांतर्गत उपायांसह समकालीन आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याच्या आणि त्यावर मात करण्याच्या भारताच्या तयारीचे स्पष्ट संकेत देऊन, भारत शक्ती जागतिक स्तरावर भारताच्या देशांतर्गत संरक्षण क्षमतांची लवचिकता, नवोन्मेष आणि सामर्थ्य ठळकपणे दर्शवते. हा कार्यक्रम भारतीय सशस्त्र दलांचे सामर्थ्य आणि परिचालन क्षमता तसेच स्वदेशी संरक्षण उद्योगाची कल्पकता आणि वचनबद्धता प्रदर्शित करून, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाची प्रगती अधोरेखित करतो.