असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात संरक्षण देण्यासाठी, भारत सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना (PM-SYM) ही निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहिना 3000/- रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल. भूमिहीन शेतमजुरांसह इतर कामगार या योजनेसाठी maandhan.in पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन विनामूल्य नोंदणी करू शकतात. देशात पाच लाखांहून अधिक सी एस सी आहेत. ही एक ऐच्छिक आणि सह-योगदान निवृत्ती वेतन योजना आहे.
18 ते 40 वयोगटातील ज्या कामगारांचे मासिक उत्पन्न 15000/- रु. किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना/कर्मचारी राज्य विमा महामंडळ/राष्ट्रीय निवृत्ती योजना (सरकार अनुदानित) चे सदस्य नाहीत, ते या योजनेत सामील होऊ शकतात. या योजनेअंतर्गत, मासिक योगदानाच्या 50% रक्कम लाभार्थ्यांच्या प्रवेशाच्या वयानुसार 55/- ते 200/- रुपये दरम्यान बदलते. केंद्र सरकारद्वारे त्याच प्रमाणात योगदान दिले जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळ या योजनेचे निधी व्यवस्थापक आहे. ठराविक कालावधीनंतर करण्यात येणाऱ्या श्रमशक्ती सर्वेक्षण 2020-21 च्या अहवालानुसार एकूण 46.5% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत.


