पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली मार्फत आयुष मंत्रालयाच्या दोन संस्थांचे उद्घाटन केले. या संस्था देशातील सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रणालीला अधिक प्रोत्साहन देतील. हरियाणातील झज्जर येथील ‘केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था’ (CRIYN) आणि महाराष्ट्रातील पुणे येथील ‘निसर्ग ग्राम’ या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे (NIN) उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आयुष तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल पश्चिम बंगालमधील कल्याणी येथून दूरदृश्य प्रणालीमार्फत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अधिक माहिती
● ‘निसर्ग ग्राम’ हे 250 खाटांचे रूग्णालय आहे ज्यामध्ये बहु-शाखीय संशोधन आणि विस्तार सेवा केंद्र आहे तसेच पदवी पूर्व (UG) आणि स्नातकोत्तर (PG) आणि पॅरा मेडिकल अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालय आहे.
● या महाविद्यालयामध्ये निवासी आणि अनिवासी सुविधा देखील उपलब्ध आहेत.
● मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, सभागृह, योग दालन, कॉटेज आणि प्रसिद्ध गांधी मेमोरियल हॉल देखील महाविद्यालय प्रांगणाचा अविभाज्य भाग आहे.
● 25 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 213.55 कोटी रुपये आहे.
● पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) आणि झज्जर येथील देवरखाना गावातील केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था (CRIYN) पारंपरिक आरोग्य सेवा प्रणालींद्वारे सर्वसमावेशक आरोग्यसेवेला चालना देण्यासाठीच्या मार्गावरील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत.


