सरदार रमेशसिंग अरोरा यांनी पंजाब प्रांताच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रांतिक विधानसभेत अरोरा यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आहे. त्यांची ही कामगिरी पाहूनच त्यांना मुख्यमंत्री मरीयम नवाज यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीनंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे अरोरा हे पहिलेच शीख मंत्री ठरले आहेत.
कोण आहेत सरदार रमेश सिंग अरोरा?
• नरोवालच्या करतारपूरचे रहिवासी सरदार रमेश सिंग अरोरा यांचा जन्म 1974 मध्ये ननकाना साहिब येथे झाला.
• लाहोरमधील सरकारी महाविद्यालयतून त्यांनी उद्योजकता आणि एसएमई व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
• 1947 च्या फाळणीदरम्यान त्यांच्या कुटुंबाने बहुसंख्य शीख आणि हिंदू कुटुंबांप्रमाणे भारतात स्थलांतर करण्याऐवजी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. “त्यांचा जन्म ननकाना साहिबमध्ये झाला, पण नंतर ते नरोवालला आले.
• राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानमध्ये जागतिक बँकेच्या गरीबी निवारण कार्यक्रमासाठी काम केले.
• 2008 मध्ये, अरोरा यांनी मोजाझ फाउंडेशनची स्थापना केली. ही एक धर्मादाय संस्था आहे, जी पाकिस्तानातील वंचित लोकांना मदत करते.
सरदार रमेश सिंग अरोरा यांचा राजकीय प्रवास
• विधानसभेतील त्यांचा पहिला कार्यकाळ 2013 ते 2018 पर्यंत चालला. 2014-17 आणि 2017-18 या वर्षांमध्ये, अरोरा यांनी गुंतवणूक, वाणिज्य आणि मानवाधिकारावरील स्थायी समित्यांचे अध्यक्षपद भूषवले.
• ‘पंजाब शीख आनंद कारज मॅरेज ऍक्ट 2018’ कायदा पाकिस्तानात लागू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ज्यामुळे पाकिस्तान शीख विवाह नोंदणी कायदा लागू करणारे पहिले राष्ट्र ठरले.
• याव्यतिरिक्त, ते 2009 ते 2013 पर्यंत पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती (पीएसजीपीसी) चे सरचिटणीस होते.
• 2011 ते 2013 दरम्यान त्यांनी राष्ट्रीय सद्भाव मंत्रालयाच्या अंतर्गत अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोगाचे सदस्यपद आणि ईव्हाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी)चे सदस्यपद भूषवले.