हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या देशातील पहिल्या स्वदेशी फेरी नौकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. कोचीन शिपयार्डने (सीएसएल) बनवलेल्या या बोटीमध्ये वापरण्यात आलेली हायड्रोजन फ्यूएल सेलची यंत्रणा पुण्यातील ‘केपीआयटी’ कंपनीने विकसित केली असून, या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचाही (एनसीएल) महत्त्वाचा सहभाग आहे.
स्वदेशी कॅटामरान फेरी नौका
• जल वाहतुकीत कार्बन नेट झिरोचे लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान
• कोचीन शिपयार्ड आणि केपीआयटीने देशातील सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यांच्या सहकार्यातून निर्मिती केली.
• जल वाहतुकीत हायड्रोजन फ्युएल सेलचा वापर नवीन असताना भारताने या क्षेत्रात आघाडी घेतल्यामुळे जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याची संधी.
अशी आहे हायड्रोजन नौका…
• इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनने जागतिक पातळीवरील जल वाहतुकीमध्ये कार्बनचा वापर 2030 पर्यंत 40 टक्क्यांनी; तर 2050 पर्यंत 70 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
• त्याला अनुसरून सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यांनी कॅटमरान प्रकारच्या फेरी बोटीची निर्मिती केली आहे.
• 24 मीटर लांबीच्या पहिल्या वातानुकूलित प्रारूपामधून 50 जण प्रवास करू शकतात.
ऊर्जा साठवण्याचे प्रगत तंत्रज्ञान…
• बॅटरीमध्ये ऊर्जा साठवणाऱ्या पारंपरिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञानापेक्षा हायड्रोजन फ्युएल सेलचे तंत्र वेगळे असते.
• फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजनचा संयोग होत असल्याने या प्रक्रियेतून पाण्याची वाफ तयार होते आणि प्रदूषण होत नाही.
• सीएसएलने विकसित केलेल्या फेरी बोटीमध्ये 50 किलोवॉट क्षमतेचा पीईएम फ्युएल सेल वापरण्यात आला आहे.
• बोटीवर हायड्रोजनच्या पाच टाक्या असून, त्यामध्ये 40 किलो हायड्रोजनचा साठा होतो.
पुण्यातील संस्थांचे योगदान
• हायड्रोजन फ्युएलसह बोटीची संचालन यंत्रणा (ड्राइव्हट्रेन) पुण्यातील केपीआयटीने विकसित केली आहे.
• त्यातील लो टेम्परेचर प्रोटॉन एक्सचेंज मेंब्रेन (एलटीपीईएम) या हायड्रोजन फ्यूएल सेलच्या निर्मितीत एनसीएलचाही महत्त्वाचा सहभाग आहे.