एचआयव्ही संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. ‘ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (Human immunodeficiency viruses : HIV)’ च्या संसर्गामुळे होणारा साथीचा रोग’ एड्स (AIDS) म्हणून ओळखला जातो. 1988 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. 1996 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एचआयव्ही / एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि 1997 मध्ये ‘जागतिक एड्स मोहिमे’अंतर्गत संसर्ग, प्रतिबंध आणि शिक्षण यावर काम करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जाऊ लागला.
पार्श्वभूमी
• एड्स दिवस, जो आज संपूर्ण जग साजरा करत आहे, त्याची संकल्पना थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू. बन यांनी 1987 मध्ये मांडली होती.
• थॉमस नेटर आणि जेम्स डब्ल्यू. बन हे दोघेही स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या एड्स ग्लोबल प्रोग्रामसाठी सार्वजनिक माहिती अधिकारी होते.
• त्यांनी एड्स दिनाची त्यांची कल्पना डॉ. जोनाथन मुन (एड्स ग्लोबल प्रोग्रामचे संचालक) यांच्याशी शेअर केली, ज्यांनी या कल्पनेला मान्यता दिली आणि १९८८ पासून, 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
• सुरुवातीला जागतिक एड्स दिन केवळ लहान मुले आणि तरुणांशी संबंधित होता, परंतु नंतर एचआयव्ही संसर्ग कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो असे आढळून आल्यानंतर 1996 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि 1997 पासून जागतिक एड्स मोहीम सुरू केली.
‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्याचा उद्देश
• ‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश प्रत्येक वयोगटातील लोकांना एचआयव्ही एड्समुळे पसरलेल्या संसर्गाबद्दल प्रबोधन करणे हा आहे.
• एड्स ही आज जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. कारण यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.
• 2021 मधील युनिसेफच्या अहवालानुसार, जगभरात 36.9 दशलक्ष लोक एचआयव्हीचे बळी ठरले आहेत. तर भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एचआयव्ही रुग्णांची संख्या सुमारे 2.1 दशलक्ष आहे.
एचआयव्ही एड्स म्हणजे काय?
• एचआयव्ही हा एक गंभीर आजार आहे जो एका प्रकारच्या प्राणघातक संसर्गामुळे होतो.
• एड्सचे पूर्ण नाव ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (Acquired Immune Deficiency Syndrome)’ आहे.
• हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/Human immunodeficiency virus) आहे.
• या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशीही लढण्यास असमर्थ ठरते. विशेष म्हणजे हा आजार तीन टप्प्यात होतो (प्राथमिक अवस्था, वैद्यकीय विलंब आणि एड्स).
1959 साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण
• असे मानले जाते की, 19 व्या शतकात पहिल्यांदाच एड्सची लागण झाली होती.
• आफ्रिकेतील माकडांच्या विशिष्ट प्रजातीमध्ये एड्स चे विषाणू आढळले.
• हा रोग माकडांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला.
• वास्तविक, आफ्रिकेतील लोक माकडे खात असत, त्यामुळे माकड खाल्ल्याने हा विषाणू मानवी शरीरात शिरला असावा असे म्हटले जाते.
• 1959 मध्ये, एचआयव्ही विषाणू पहिल्यांदा एका आजारी कॉंगोली माणसाच्या रक्ताच्या नमुन्यात त्याच्या मृत्यूनंतर आढळून आला. तो पहिला एचआयव्ही बाधित व्यक्ती असल्याचे मानले जाते.
• किन्शास हे त्या काळात देहव्यापाराचे केंद्र होते. अशा प्रकारे हा रोग देहव्यापार आणि इतर मार्गांनी इतर देशांत पोहोचला.
• 1960 मध्ये हा रोग आफ्रिकेतून हैती आणि कॅरिबियन बेटांवर पसरला.
• वास्तविक, हैतीयन लोक काँगोच्या वसाहती लोकशाही प्रजासत्ताकमध्ये काम करत असत. जिथे स्थानिक पातळीवर शारीरिक संबंधांमुळे हा आजार इतरांमध्ये पसरला.
• जेव्हा ते त्यांच्या घरी परतले, तेव्हा विषाणू त्यांच्याबरोबर हैतीला गेला. त्यानंतर 1970 च्या दशकात हा विषाणू कॅरिबियन ते न्यूयॉर्क शहरापर्यंत पसरला आणि नंतर अमेरिकेपासून उर्वरित जगामध्ये पसरला.
• पुढे 1980 नंतर हा रोग जगभर खूप वेगाने पसरला. तेव्हापासून जगभरातील लाखो लोकांना एड्समुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
2023 ची ‘जागतिक एड्स दिना’ची थीम : ‘लेट कम्युनिटीज लीड’,
• एड्सनं बाधित समुदायांना नेतृत्व भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे.
• ही थीम एड्सनं बाधित झालेल्या लोकांना आवाज उठवण्यास आणि त्यांचं जीवन सुधारण्यासाठी कृती करण्यास सक्षम असण्याची गरज अधोरेखित करते.
• एड्स बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. जेणेकरुन WHO नुसार या थीमचा उद्देश पूर्ण होऊ शकेल.


