वसुंधरेच्या संवर्धनासाठीची वचनबद्धता दर्शवण्यासाठी 22 एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो.
थीम:
2023 या वर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची थीम ‘इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट‘ (“Invest in Our Planet.”)अशी आहे. म्हणजे ‘आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा’.
या थीमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे असे आहे.
याआधी 2022 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती ‘आमची पृथ्वी पुनर्संचयित करा’.
मूळ संकल्पना आणि सुरवात:
जागतिक वसुंधरा दिवस जागतिक स्तरावर 192 देशांद्वारे साजरा केला जातो.
60-70 च्या दशकात जंगले आणि झाडांची अंदाधुंद कत्तल पाहता, सप्टेंबर 1969 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन येथे एका परिषदेत, विस्कॉन्सिनचे अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली.
त्यांनी अमेरिकेतील 2 कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला.
अशा प्रकारे 1970 या वर्षापासून हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ (अर्थ डे) जगभर साजरा केला जाऊ लागला.
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन‘ म्हणूनही ओळखला जातो.
आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याचीच आठवण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यामुळेच या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
2023 हे जागतिक वसुंधरा दिनाचे एकूण 53 वे वर्ष आहे