Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

स्वप्नील कुसाळेने पटकावले ऐतिहासिक कांस्य पदक

स्वप्नील कुसाळेने पटकावले ऐतिहासिक कांस्य पदक
  • महाराष्ट्राचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिसमधील ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात ’50 मीटर रायफल थ्री पोझिशन’ या प्रकारात ऐतिहासिक कांस्य पदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर डौलाने फडकावला.
  • ऑलिम्पिक पदार्पणात कोल्हापूरच्या स्वप्नीलने फार अवघड मानल्या जाणाऱ्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करतानाच इतिहास रचला.
  • नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
  • 28 वर्षीय स्वप्नील याने महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
  • खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावत इतिहास घडविला होता.
  • त्यानंतर तब्बल 72 वर्षांनंतर स्वप्नील याने ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राला पदक मिळवून दिले.

 

स्वप्नील पहिलाच पदक विजेता..

  • ऑलिम्पिकमध्ये रायफल थ्री- पोझिशन प्रकारात पदक जिंकणारा स्वप्निल भारताचा पहिलाच नेमबाज आहे.
  • याआधी 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर ‘प्रोन’ (पोटावर झोपून वेध साधणे) प्रकारात जॉयदीप कर्माकर चौथा आला होता.
  • पुढे ऑलिम्पिकमधून 50 मीटर ‘प्रोन’ हा प्रकार वगळण्यात आला आणि त्याची जागा थ्री-पोझिशन प्रकाराने घेतली.
  • थ्री-पोझिशन प्रकारात मांडीवर बसून (नीलिंग), मग पोटावर झोपून (प्रोन) आणि शेवटी उभे राहून (स्टैंडिंग) वेध घेतला जातो.
  • या प्रकारात चीनच्या लिऊ युकून याने 6 गुणांसह सुवर्णपदक पटकावले तर युक्रेनच्या सेरी कुलिश याने 461.3 गुणांसह रौप्यपदक पटकावले तसेच स्वप्निलने 451.4 गुणांसह कांस्यपदक मिळवले.

स्वप्नीलचा कोल्हापूर ते पॅरिस प्रवास

  • जन्म :  6 ऑगस्ट 1995 (वय २८) कांबळवाडी, जि.कोल्हापूर
  • स्वप्नील 2015 पासून पुण्यात भारतीय रेल्वेत तिकीट तपासनीस आहे.
  • त्याचे वडील आणि भाऊ शिक्षक असून, आई सरपंच आहेत.
  • स्वप्नीलने 2022 च्या कैरो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सांघिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
  • त्याने 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सांघिकमध्ये सुवर्ण मिळवले आहे.
  • त्याने 2022च्या हाँग्वझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा स्वप्नीलचा आदर्श.
  • मागील बारा वर्षांपासून स्वप्नील नेमबाजी करीत आहे. त्याने महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदक मिळवले आहे.

 ‘पशुसंवर्धन पंधरवडा

  • पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध पशु वैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पशुपालकांना व्हावी या दृष्टिकोनातून 1 ते 15 ऑगस्ट या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

 पशुसंवर्धन पंधरवडा मध्ये हाती घेण्यात येणारे उपक्रम

1) जनजागृती:-

  • पशुपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी उच्च उत्पादन व प्रजनन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ्य, पशुखाद्य पशु चारा व व्यवस्थापन या पंचसूत्रीचे महत्व केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन योजनांमध्ये सहभागी होण्यास पशुपालकांना प्रवृत्त करणे

2) लसीकरण व जंत निर्मूलन :-

  • पशुधनास लाळखुरकूत, संसर्गिक गर्भपात ,लम्पि, चर्मरोग घटसर्प , इत्यादी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करणे.
  • जंत निर्मूलन करणे
  • बाह्य परोपजीवी निर्मूलनासाठी औषध फवारणी.

3) वंध्यत्व निवारण व पशु आरोग्य शिबिरे:-

  • गोवंशीय पशुधनातील भाकड काळ कमी करण्यासाठी तपासणी
  • वंध्यत्व निवारण व पशु आरोग्य शिबिर आयोजित करणे.

4) दूध अनुदान योजना :

  • योजनेचे लाभ सर्व दूध उत्पादकांना मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • योजना राबविताना दूध उत्पादकस येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे.

5) पशुचारा ,पशुखाद्य :

  • पशुपालन व्यवसायात सकस चारा/ पशुखाद्याचे महत्त्व पशुपालकांना पटवून देणे.
  • चारा उत्पादन तसेच पशुखाद्य निर्मिती योजनेच्या संदर्भात मार्गदर्शन
  • ‘चारा स्वयंपूर्ण गाव’ संकल्पना राबविणे .

6) पशुगणना:

  • पशु गणनेचे महत्त्व विषद करणे
  • 21व्या पशु गणनेत सहभागी होण्याचे आवाहन करणे.

 

लाडकी बहीणसाठी नवीन संकेतस्थळ सुरू

  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.
  • त्यासाठी ladkibahin.maharashtra. gov.in संकेतस्थळ  सुरू करण्यात आले आहे.
  • या संकेतस्थळावर गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता यापूर्वी नारी शक्तीदूत अॅपवरून अर्ज केले असतील, त्यांनी यात पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये.
  • अद्यापही अर्ज सादर न केलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

 

 अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा राज्यांना अधिकार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अधिक मागासलेल्या जातींच्या विकासाच्या हेतूने आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जातींमध्ये (एससी) उपवर्गीकरण (अंतर्गत कोटा) करण्याचा राज्यांना घटनात्मकदृष्ट्या अधिकार आहे, असा ऐतिहासिक निकाल  सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने दिला.
  • या निकालामुळे प्रत्येक राज्याला आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे.
  • राज्य सरकारे आता शासकीय नोकऱ्यांत अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या इतर जातींसाठी राखीव जागा ठेऊ शकतील.
  • सर्वोच्च न्यायालयाचा सुमारे दोन दशकांपूर्वीचा निकाल रद्द करताना, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा ऐतिहासिक व दूरगामी निकाल दिला.
  • पंजाब राज्य आणि इतर विरुद्ध दविंदर सिंग आणि इतर या प्रकरणात घटनापीठाने हा निकाल दिला.
  • सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती भूषण गवई, विक्रम नाथ, बेला एम. त्रिवेदी,पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीशचंद्र शर्मा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने या संदर्भातील ई. व्ही. चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यातील आधीचा निकाल रद्द केला.
  • मागासवर्गीयांचे उपवर्गीकरण राष्ट्रपतींना मागासवर्गीयांची यादी तयार करण्याचा अधिकार देणाऱ्या  राज्यघटनेच्या कलम 341च्या विरुद्ध  आहे, असे दोन दशकांपूर्वीच्या  निकालात म्हटले होते.
  • सात सदस्य घटना पीठाने हा निकाल सहा विरुद्ध एक मताने रद्द केला.
  • बेला एम. त्रिवेदी यांनी विरोधात मत टाकले. 

 निकालातील ठळक मुद्दे

  • ‘एससी ‘मधील कोणत्याही एका जातीला 100 टक्के राखीव जागा देता येणार नाहीत.
  • शासकीय सेवांमध्ये उपश्रेणींचे तोकडे प्रतिनिधित्व दाखवणारी आकडेवारी आवश्यक
  • अनुसूचित जाती हा एकसंध गट नसून, ते वर्गामध्ये विभागले जाऊ शकतात.
  • राज्यघटनेचा ‘अनुच्छेद १४’ समान नसलेल्या वर्गाच्या उपवर्गीकरणास परवानगी देतो.
  • अनुसूचित जाती हा सामाजिकदृष्ट्या विषम वर्ग असल्याचे ऐतिहासिक आणि अनुभवजन्य पुरावे दाखवतात
  • अनुसूचित जातींतूनही क्रीमिलेअर वगळण्यासाठी आग्रही

भारत व्हिएतनाम यांच्यात महत्वपूर्ण करार

  • समृद्ध आणि एकमेकांच्यात गुंफलेला सागरी इतिहास असलेले भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश गुजरातमध्ये लोथाल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी एकत्र येत आहेत.
  • अनेक शतकांपासून चालत आलेल्या सागरी संबंधांमध्ये रुजलेली ही भागीदारी या दोन्ही देशांमध्ये असलेला चिरस्थायी बंध आणि त्यांचा सामायिक वारसा जतन करुन साजरा करण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस येथे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • दोन्ही देशांच्या एकत्र येण्यात या दोन्ही देशांच्या सागरी वारशाचे दर्शन घडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त विविध पैलूंचा समावेश असणार आहे.
  • सदर संकुलात भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर अधिक भर देण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सामायिक सागरी इतिहासातील जवळीक आणि दीर्घकालीन अस्तित्व यावर अधिक भर  असेल.
  • आगामी काळात दोन्ही देश आपापल्या सागरी इतिहासाशी संबंधित कलाकृती, प्रतिकृती, चित्रे, पुरातत्वीय डाटा तसेच इतर पुरातन वस्तू यांची देवाणघेवाण आणि कर्ज देण्यासंदर्भात एकत्र येऊन काम करतील.
  • कलाकृतींच्या देवाण-घेवाणीसोबतच या सहयोगी संबंधाच्या माध्यमातून संरचना, तांत्रिक अंमलबजावणी तसेच देखभाल यांच्या संदर्भातील अनुभव देखील सामायिक केले जातील .
  • राष्ट्रीय सागरी वारसा संकुल येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी एक शैक्षणिक आणि मनोरंजनपर जागा उभारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
  • व्हिएतनाम आणि भारत आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने सागरी वारसा तसेच डिझाइनविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि सागरी वारसा आणि संवर्धन प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी देखील सहकार्य करतील.
  • राष्ट्रीय सागरी वारसा संकुल हे सांस्कृतिक देवाणघेवाण, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम आणि प्रदर्शन यावर अधिक भर देणारे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला येईल.
  • या उपक्रमामुळे व्हिएतनाम आणि भारत यांच्यातील समृद्ध सागरी इतिहासाचे संवर्धन तर होईलच शिवाय दोन्ही राष्ट्रांमध्ये  सामंजस्य आणि सहकार्य वृद्धिंगत होईल आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल.
  • राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पासाठी गुजरात सरकारने सरगवाला गावात 400 एकर जमीन दिली आहे आणि प्रकल्पासाठी इतर  पायाभूत सुविधांचा विकास देखील हाती घेतला आहे.
  • टप्पा 1A चे बांधकाम जोरात सुरू आहे आणि 55% पेक्षा जास्त बांधकाम झाले आहे.
  • हा प्रकल्प जनतेसाठी पुढील वर्षी खुला होईल.
  • सागरी संकुलात जगातील सर्वात उंच दीपगृह संग्रहालय, जगातील सर्वात मोठी खुली जलचर गॅलरी आणि भारतातील सर्वात भव्य नौदल संग्रहालय असेल, ज्यामुळे ते एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *