ग्लाईड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 MK-I प्लॅटफॉर्मवरून लांब पल्ल्याचा ग्लाईड बॉम्ब गौरवची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे.
- ही चाचणी ओडीशाच्या किनारपट्टीवर घेण्यात आली.
- गौरव हा हवेतून सोडण्यात येणारा 1000 किलो श्रेणीतील ग्लाईड बॉम्ब असून लांब अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची त्याची क्षमता आहे.
- हा ग्लाईड बॉम्ब टाकल्यानंतर आयएनएस आणि जीपीएस डेटा यांच्या एकत्रित वापराने अतिशय अचूक हायब्रिड दिशादर्शन प्रणालीद्वारे तो लक्ष्याच्या दिशेने प्रवास करू लागतो.
- गौरवची रचना आणि विकास स्वदेशी बनावटीने हैदराबादच्या रिसर्च सेंटर इमारतने केला आहे.
- या चाचणी उड्डाणादरम्यान ग्लाईड बॉम्बने दूर अंतरावर असलेल्या व्हीलर बेटावर उभारलेल्या लक्ष्याचा अतिशय अचूकतेने वेध घेतला.
- यावेळी या किनारपट्टीवर एकात्मिक चाचणी तळावर तैनात केलेल्या टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीने या चाचणी उड्डाणाचा संपूर्ण फ्लाईट डेटा ग्रहण केला.
- डीआरडीओच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या उड्डाणावर देखरेख ठेवली.
- या चाचणी उड्डाणामध्ये अदानी डिफेन्स आणि भारत फोर्ज या विकास आणि उत्पादन भागीदार कंपन्या देखील सहभागी झाल्या.
- या यशस्वी चाचणी उड्डाणाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले.
- संरक्षण दलांच्या क्षमतेला बळकटी देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या देशाच्या प्रयत्नांमध्ये ही चाचणी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे.
अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार
- महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2024 या वर्षासाठीचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे.
- याशिवाय जीवनगौरव आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत.
- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
- जीवनगौरव पुरस्कारांची रक्कम दहा लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे स्वरूप आहे.
- राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तीन लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.
- ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’सोबतच नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा मुनगंटीवार यांनी केली आहे.
- त्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे.
- विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन 2024 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर- टिळेकर यांना जाहीर झाला आहे.
- ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुद्धीसागर यांना जाहीर झाला आहे.
- ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला.
- संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.
- संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन 2024 चा ‘ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार’ संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.
- ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव’ पुरस्कार 2023 साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून 2024 साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे.
- तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.
नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी
- राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
- राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक – निवडणुका 2021-22 मध्ये झाल्या असून, त्यातील नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.