अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी प्रतिष्ठित व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन प्रदान करून भारतीय वंशाचे अमेरिकेत संशोधक अशोक गाडगीळ यांचा सन्मान केला. भारतीय वंशाचे दुसरे अमेरिकी संशोधक डॉक्टर सुब्रा सुरेश यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स प्रदान केले. या दोघांसह 12 अमेरिकेन संशोधकांचा सन्मान केला.
अमेरिकेने शास्त्रज्ञांकडून तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा सन्मान करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी 1985 मध्ये या सन्मानाची सुरुवात करण्यात आली. सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविणारे तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षम स्टोव्ह आणि कार्यक्षम विद्युत प्रकाश वाजवी दरात बनवण्याच्या मार्गांसह विकसनशील जगातील सर्वाधिक गुंतगुंतीच्या काही समस्यांसाठी कमी किमतीचे उपाय विकसित करण्याचे काम अशोक गाडगीळ यांनी केले आहे .
डॉक्टर सुरेश यांना हे पदक अभियांत्रिकी, भौतिक विज्ञान आणि जीवन विज्ञानातील अग्रगण्य संशोधनासाठी देण्यात आले. अशोक गाडगीळ यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1950 रोजी मुंबईत झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी मिळवली असून 1973 मध्ये आयआयटी कानपूर येथे एमएस्सी पूर्ण केले तर कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ येथे भौतिकशास्त्रात पीएचडी केली . त्यानंतर 1980 मध्ये ते लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी येथे रुजू झाले आणि या वर्षाच्या सुरुवातीला फॅकल्टी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले.
डॉक्टर सुब्रा सुरेश हे नॅशनल सायन्स फाउंडेशन चे माजी प्रमुख असून ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये प्राध्यापक आहेत.


