शीत युद्धाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शांतता नोबेल पुरस्कार प्राप्त हेन्री किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. रिपब्लिकन पक्षाच्या रिचर्ड निक्सन आणि गिराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी आपली छाप सोडली. ती त्यांच्या निवृत्तीनंतरही अनेक वर्ष टिकून राहिली. त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे त्यांची प्रशंसाही झाली होती आणि ते टीकेचे धनीही ठरले होते. रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात किसिंजर हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात.
अल्पपरिचय
• हेन्रि किसिंजर यांचा जन्म 27 मे 1923 रोजी जर्मनीमधील फूर्थ येथे एका ज्यू कुटुंबात झाला.
• त्यांचे मूळ नाव हाइन्झ अल्फ्रेड किसिंजर.
• जर्मनीत वाढत्या नाझीवादामुळे किसिंजर कुटुंबाने 1938 मध्ये अमेरिकेत स्थलांतर केले.
• हेन्री यांना 1943 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
• त्यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात अमेरिकी लष्करात सेवा बजावली.
• 1952 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवून मास्टर्स आणि 1954 मध्ये डॉक्टरेट मिळवली त्यानंतर 17 वर्षे त्यांनी हार्वर्ड मध्ये अध्यापन केले.
• 1973 यावर्षी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
किसिंजर यांची परराष्ट्र विभागातील कारकीर्द
• किसिंजर यांनी दीर्घकाळ अमेरिकी सरकारच्या संस्थांमध्ये सल्लागार म्हणून काम केले.
• 1967 मध्ये त्यांनी व्हिएतनामध्ये परराष्ट्र खात्याचे मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली.
• तेथील त्यांचे काम पाहून निक्सन यांनी त्यांची 1968 यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या काळात त्यांनी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले.
• किसिंजर यांनी 1969 ते 1977 दरम्यान रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले.
• व्हिएतनाम युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल 1973 मध्ये उत्तर व्हिएतनामच्या ले दुक थाओ यांच्याबरोबर त्यांना संयुक्तपणे शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला.


