आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राचे पाचवे संचालक म्हणून वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ रघुनाथन श्रीआनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांची नियुक्ती जाहीर केली. ‘आयुका’ चे याआधीच संचालक प्रा. सोमक रायचौधरी यांच्या राजीनाम्यानंतर श्रीआनंद हे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळत होते.
रघुनाथन श्रीआनंद
• प्रा. श्रीआनंद यांचे संशोधन विश्वरचनाशास्त्र, क्वेसार आणि वैश्विक सूक्ष्मतरंग लहरीवर असून निरीक्षणात्मक आणि सैद्धांतिक आशा दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची जगभरात दखल घेण्यात आली आहे.
• खगोलशास्त्रातील विशेष संशोधनासाठी त्यांना 2008 मध्ये मानाच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
• प्रा. श्रीआनंद हे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ संघटनेचे मानद सभासद असून, 1996 या वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
• ‘आयुका’मध्ये अधिष्ठाता म्हणूनही प्राध्यापक श्रीआनंद यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
• भारतीय अवकाश मोहिमांच्या साहाय्याने जमा होणाऱ्या खगोलशास्त्रीय नोंदीवर आधारित संशोधन देशातील विद्यापीठांमध्ये वाढीस लागावे यासाठी श्रीआनंद यांचे विशेष प्रयत्न आहेत.
आयुका: (IUCAA)
• इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स ( Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे.
• ती आयुका या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे.
• या संस्थेमध्ये प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते.
• प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते.
• आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोर्रिआ यांनी केली.
पार्श्वभूमी
• खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी अजित केंभावी आणि नरेश दधिच यांच्यासोबत 1988 मध्ये आयुकाची स्थापना केली.
• 2002 साली आयुकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी नागपूर (महाराष्ट्र), तिरुवला (केरळ), सिलिगुरी (पश्चिम बंगाल) येथील विद्यापीठांसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मदतीने अभ्यागत कार्यक्रम सुरू केला.
• 2004 साली आयुकाने पु.ल. देशपांडे संस्थेच्या अनुदानाने “मुक्तांगण विज्ञान शोधिका” या विज्ञान केंद्राची सुरुवात केली. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.
• 2009 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी आयुकाची निवड करण्यात आली.
• प्रा. जयंत नारळीकर पहिली दहा वर्षे आयुकाचे संचालक होते. त्यानंतर अनुक्रमे प्रा. नरेश दधिच व प्रा. अजित केंभावी आयुकाचे संचालक होते. सप्टेंबर 2015 पासून डॉ. सोमक रायचौधुरी आयुकाचे संचालक होते.


