शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. रेडिओ म्हणजे अमीन सयानी यांचा आवाज हे समीकरण बनले आहे. ‘बहनों और भाईयों…’ अशी साद घालत सुरू होणारा त्यांचा ‘गीतमाला’ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हातातील काम टाकून रेडिओला चिकटून बसत. त्यांचा आवाज, त्यांच्या शब्दांत ऐकलेले जुन्या हिंदी चित्रपटांचे किस्से, लता मंगेशकर राज कपूर आदी दिग्गज कलावंतांच्या मुलाखती यांच्या स्मृती आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
अधिक माहिती
● मुंबईत 1932 मध्ये गुजराती गीतमाला कुटुंबात अमीन सयानी यांचा जन्म झाला.
● रेडिओशी त्यांची नाळ त्यांचे बंधू हमीद सयानी यांच्यामुळे जोडली गेली. त्यांचे बंधू इंग्रजी उद्घोषक म्हणून काम करत होते.
● अमीन सयानी सात वर्षांचे असताना त्यांना त्यांच्या बंधूनी चर्चगेट येथील आकाशवाणी केंद्रात नेले होते. तिथे त्यांनी पहिल्यांदा इंग्रजीत उद्घोषणा केली. त्यानंतर ते ग्वाल्हेर येथे पुढील शिक्षणासाठी रवाना झाले.
● अमीन सयानी यांनीही इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणूनच आकाशवाणीवर कारकीर्दीला सुरुवात केली होती.
● देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदीतून निवेदन केले.
● रेडिओवरील सहा दशकांच्या प्रवासात सयानी यांनी या निवेदनाबरोबर अनेक गायक, गीतकार, संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते केले.
● 54 हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 19 हजार जिंगल्स त सादर करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.