चंद्रावर भारताच्या ‘चांद्रयान 3’ चे विक्रम लँडर उतरले त्या ठिकाणाच्या ‘शिवशक्ती’ या नावाला – आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेकडून (आयएयू) अधिकृत मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ऑगस्ट 2023 ला बेंगळुरू येथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांशी संवाद साधताना या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ हे नाव देण्याची घोषणा केली होती.
अधिक माहिती
• चंद्रावर मानवी आणि मानवरहित मोहिमा जाण्यास सुरुवात झाली, तेव्हापासूनच यान उतरण्याचे ठिकाण आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशासाठी ठरावीक नावे देण्यास सुरुवात झाली.
• या नावांमध्ये चंद्रावर यानाचे लँडिंग झालेली ठिकाणे ‘स्टेशिओ’ म्हणून नमूद केली असून, त्यामध्ये अमेरिकेच्या ‘अपोलो 11’ मोहिमेच्या लँडिंगचे ठिकाण- स्टेशिओ ट्रॅक्विलीटाटिस (1973 मध्ये मान्यता), चीनच्या स्टेशिओ तियानहे (2019 मध्ये मान्यता), स्टेशिओ तियानशुआन (2021 मध्ये मान्यता) या यानांच्या लँडिंगच्या ठिकाणांचा समावेश आहे.
• चंद्रावरील ठिकाणांना अधिकृत नावे देण्याचे काम आयएयूचा ‘वर्किंग ग्रुप ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम नॉमेन्क्लेचर’ हा विभाग करतो.
• या विभागाने जारी केलेल्या ठिकाणांच्या यादीमध्ये 2021 पर्यंतच्या 85 नावांचा समावेश होता.
• आता 19 मार्च 2024 ला या यादीमध्ये भारताने सुचवलेल्या ‘शिवशक्ती’ या 86 व्या नावाचाही समावेश केला आहे.
• ‘आयएयू’ने जारी केलेल्या माहितीनुसार, ‘भारताच्या चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्रावर उतरले ते ठिकाण 19 मार्च 2024 पासून ‘स्टेशिओ शिवशक्ती’ या नावाने ओळखले जाईल.
• शिवशक्ती हे संयुक्त नाम असून, ते प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार नैसर्गिक द्वैताचे दर्शन घडवते.’