महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते यांची केंद्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दाते भारतीय पोलिस सेवेच्या 1990च्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ‘एनआयए’च्या महासंचालकपदी दाते यांची नियुक्ती केली असून, निवृत्तीपर्यंत म्हणजे, 31 डिसेंबर 2026पर्यंत दाते यांचा कार्यकाळ असेल. ‘एनआयए’चे विद्यमान महासंचालक दिनकर गुप्ता 31 मार्चला निवृत्त होत आहेत.
दाते यांच्याविषयी…
• भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) 1990 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या दाते यांनी 2020 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस दलाचे पहिले आयुक्तपद भूषविले.
• पोलीस सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था आणि त्यानंतर मुंबई शहरातील गुन्हे शाखेचे ते सहआयुक्त राहिले आहेत. दाते यांनी त्यांच्या मूळ गावी, पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली आहे.
• केंद्रात सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करत असताना छत्तीसगढसह देशातील अनेक भागांत नक्षलवादी कारवायांविरोधात सशस्त्र अभियान राबविण्यात आले होते.
• दाते यांच्या संकल्पनेतून 2012 मध्ये मुंबईतील प्रत्यक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी कक्षाची स्थापना करण्यात आली.
एनआयए : (राष्ट्रीय तपास संस्था)
• राष्ट्रीय तपास संस्था तथा ‘राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण’ ही भारतातील अतिरेकी व फुटीरवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली एक संस्था आहे.
• ही संस्था, अतिरेकी-विरोधी कायदा अंमलबजावणी संस्था म्हणून कार्य करते.
• या संस्थेस, भारतातील राज्यांत, राज्य सरकारची विशेष परवानगी घेतल्याशिवाय, अतिरेक्यांशी संबंधित गुन्हे हाताळण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
• ही संस्था, भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम, 2008 अन्वये अस्तित्वात आली.
• मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा एखाद्या संस्थेची तातडीने गरज भासल्यामुळे, ही संस्था निर्माण करण्यात आली. या संस्थेचे संस्थापक संचालक हे राधा विनोद राजु होते.
• स्थापना: 2009
• मुख्यालय: नवी दिल्ली