आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.
सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली.21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला.
योग दिवस 21 जूनच का?
21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो.21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे 5 हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम:
योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 साठी “मानवता” ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग हे ब्रीद वाक्य असल्याचे स्पष्ट केले.
उपराष्ट्रपतींच्या हस्ते साजरा होणार 9 वा योग दिन:
21 जून रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या नेतृत्वाखाली 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 चा राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे.आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 चे ब्रीदवाक्य “वसुधैव कुटुंबकमसाठी योग” हे आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 चा जागतिक कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणार आहे.या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी वैशिष्ट्यपूर्ण असे ओशन रिंग ऑफ योग पहायला मिळेल ज्यात भारतीय नौदल आणि व्यापारी जहाजे वेगवेगळ्या महासागरातील मित्र देशांच्या बंदरांवर/जहाजांवर योग प्रात्यक्षिके आयोजित करतील.
आर्क्टिक ते अंटार्क्टिका पर्यंत योग हे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र सदस्य देशांबरोबरच मुख्य रेखावृत्तावरील आणि आसपासच्या देशांमध्ये योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आयुष मंत्रालयाबरोबर समन्वय साधत आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या समन्वयाने उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव प्रदेशांवर योगाभ्यास आयोजित करण्यात आला असून आर्क्टिकमधील भारतीय संशोधन केंद्र हिमाद्री इथे आणि अंटार्क्टिकातील भारतीय संशोधन केंद्र भारती येथे ही योग प्रात्यक्षिके आयोजित केली जातील.
योग भारतमालाची संकल्पना आखण्यात आली असून यात भारतीय सशस्त्र दल इंडो तिबेट सीमा पोलीस दल , सीमा सुरक्षा दल, सीमा रस्ते संघटनेसोबत योग प्रात्यक्षिकांची एक साखळी बनवतील. योग सागरमाला मध्ये भारतीय किनारपट्टीवर योगाभ्यास पहायला मिळेल.संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आयएनएस विक्रांतच्या फ्लाइट डेकवर योग प्रात्यक्षिके सादर केली जातील.
काम करताना तणावमुक्त होवून, ताजेतवाने होवून आपल्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे, या उद्देशाने यावर्षी कामाच्यास्थानी वाय-ब्रेकम्हणजे योगासनासाठी ब्रेक देण्याची संकल्पना आयुष मंत्रालयाने मांडली आहे. यासाठी यावर्षी Y-break@workspaces ‘योग इन चेअर’ म्हणजे खुर्चीवर बसल्या ठिकाणी योग करता येणार आहे. भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना/विभागांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खुर्चीत बसून योगासन करण्यास सांगावे.


