झाकीर हुसेन यांचे निधन
- तबलावादनाला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य वेचणारे, जागतिक ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथे फुप्फुसाचा संसर्ग असलेल्या ‘इडियोपॅथिकपल्मनरी फायब्रोसिस‘ या आजाराने निधन झाले.
- झाकीर यांच्या या आकस्मिक देहावसानामुळे संगीतरसिकांना मोठा धक्का बसला. तबल्यावर आपल्या जादुई हातांनी दैवी ताल निर्माण करणारे ‘जादूगार’ झाकीर यांच्या निधनाने तबल्यावरील थाप ‘शांत’ झाली असून, एका मोठ्या कालखंडाला विराम मिळाल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.
- संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ (रख कुरेशी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. बालपणापासून त्यांनी तबलावादनातील विविध बारकावे आणि शैली आत्मसात केल्या.
- झाकीर हुसेन यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम वयाच्या बाराव्या वर्षी, अर्थात 1963 मध्ये केला.
- झाकीर हुसेन यांनी आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस 1970 मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात तबलावादनाचे दीडशेहून कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले.
- त्यांनी सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशिष खान यांसोबत ‘शांतिगट’ (1970), पुढे इंग्रज गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन व व्हायोलिनवादक एल. शंकर यांच्यासोबत ‘शक्तिगट’ (1975) स्थापन केला. शिवाय ते सोलो तबलावादनाच्या रंगतदार मैफली करीत.
- त्यांनी तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा त्यांचा सखोल अभ्यास होता.
- तबलावादनातील त्यांचा जोश, बोटांची किमया आपल्याला पदोपदी जाणवते.
अल्प परिचय
- 9 मार्च 1951 रोजी मुंबईमध्ये जन्म
- वडील उस्ताद अल्लारखा थोर तबलावादक, एक भाऊ तौफिक कुरेशी तालवादक, आणखी एक भाऊ फझल कुरेशी तबलावादक
- माहीममधील सेंट मायकेल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण
- सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवी शिक्षण
- पत्नी अँटोनिया मिनेकोला या कथक नर्तक आणि शिक्षिका
- अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली
मान–सन्मान
- एप्रिल 2024 मध्ये 66 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात तीन ग्रॅमी
- 2023 आणि 2024 साठी डाउनबीट क्रिटिक्स पोलमध्ये वर्षाचा तबलावादक म्हणून सर्वाधिक मते
- 2023चा जाझ जर्नलिस्ट्स परफॉर्मन्सचा ‘वर्षाचा तबलावादक’
- भारत सरकारकडून 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023मध्ये पद्मविभूषण
- 2022मध्ये कला व तत्त्वज्ञानासाटी क्योटो प्राइझ लॉरेट म्हणून निवड
- ऑक्टोबर 2022मध्ये ओमान देशात आगा खान संगीत पुरस्कार
- 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांसाठी डाउनबीट क्रिटिक्स पोलमध्ये सर्वोत्तम तबलावाद
- 1990 संगीत नाटक अकादमी पुरस्कार
चित्रपटांतून भूमिका
- झाकीर यांना तबलावादनाबरोबरच अभिनयाचीदेखील आवड आहे. झाकीर यांनी सन 1983 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.
- ‘हीट अँड डस्ट’ या सिनेमात त्यांनी काम केले होते. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते दिवंगत शशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
- त्यानंतर झाकीर यांनी अनेक सिनेमांत काम केले.
- 1988मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द परफेक्ट मर्डर’ सिनेमातही त्यांनी काम केले.
- सन 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस बॅटीज चिल्डर्स’, 1998मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साज’ सिनेमातही त्यांनी भूमिका केली होती.
अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन
- राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २० ते २२ डिसेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात होईल.
- यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड संमेलनाध्यक्ष, तर पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष असतील.
- पुणे महापालिकेची मराठी भाषा संवर्धन समिती आणि संवाद, पुणे यांच्यावतीने संमेलन भरविण्यात आले आहे.