मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’
चक्रीवाळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात उत्तरेकडे सरकताना या वादळाची तीव्रता वाढत जाणार आहे. आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 24 तासांमध्ये डिप्रेशन, डीप डिप्रेशनवरून चक्रीवादळापर्यंत पोहोचली. अरबी समुद्राचे तापमान सरासरी पेक्षा जास्त असल्याने वादळाला मोठी ऊर्जा मिळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ हे नाव बांगलादेशने दिले. ‘बिपरजॉय’ नावाचाचा अर्थ आपत्ती असा होतो.
चक्रीवादळाची निर्मिती का?
अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या निर्मितीबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीओलॉजिमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रॉक्सि कोल यांच्या मते, “अरबी समुद्राचे तापमान सध्या 31 ते 32 अंश सेल्सिअस इतके नोंदले जात आहे. जे सरासरीपेक्षा दोन ते चार अंशाने अधिक आहे याच काळात मान्सूनच्या प्रवाहाला जोर न येणे आणि मेडन ज्युलियन ऑसिलेशन(एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र हिंदी महासागरावर येणे या बाबींच्या एकत्रित परिणामामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.” समुद्राच्या तापमानातील वाढीचा थेट संबंध हवामान बदलाशी जोडला जातो. कमी वेळात वादळाची तीव्रता वाढणे हा देखील त्याचाच परिणाम आहे.



