ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 15 टक्क्यांची वाढ झाली आहे तर गेल्या पाच वर्षांत ही संख्या 20 टक्क्यांनी वाढली असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भारत, चीन ,नेपाळ कोलंबिया आणि व्हिएतनाम या देशातील असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. युनिव्हर्सिटी लिविंगतर्फे ‘ बियॉण्ड बेड्स: डिकोडिंग ऑस्ट्रेलियाज स्टुडन्ट हाऊसिंग मार्केट’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार ऑस्ट्रेलियातील शिक्षणाची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे. मार्च 2023 पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियात 6 लाख 13 हजार 217 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षणामध्ये नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी 33% आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमुळे ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेमध्ये 30 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर पेक्षा अधिक भर पडण्याचा अंदाज आहे.


