Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गोंड राणी दुर्गावती पुतळ्याचे अनावरण

गोंड राणी दुर्गावती पुतळ्याचे अनावरण

मुलांना समाजमाध्यमावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश

  • ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना समाजमाध्यमे वापरण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर करण्यात आला.
  • हा कायदा फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या इन्स्टाग्रामपासून सर्व समाजमाध्यमांना लागू असून नियमभंग केल्यास कंपन्यांना 32 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.
  • मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
  • ‘समाजमाध्यम वयोमर्यादा किमान विधेयक’ ऑस्ट्रेलियाच्या सिनेटमध्ये 34 विरुद्ध 19 मतांनी मंजूर करण्यात आला.
  • कनिष्ठ सभागृहात 102 विरुद्ध 13 अशा घवघवीत मताधिक्याने या विधयेकावर मान्यतेची मोहोर उमटवली होती.
  • नव्या कायद्यानुसार 16 वर्षांखालील मुलांना टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर खाती उघडण्यास बंदी असेल. याची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर मात्र मोठ्या रकमेचा दंड कंपन्यांना भरावा लागेल.
  • नव्या कायद्यावर ऑस्ट्रेलियामध्ये मतमतांतरे आहेत. बालहक्क संघटनांनी कायद्याला विरोध केला असला तरी पालकांकडून मात्र नव्या कठोर नियमांचे स्वागत केले गेले आहे.

अण्वस्त्रवाहू के – 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारतीय नौदलाने 27 नोव्हेंबर रोजी के-4 अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • यामुळे भारताची आण्विक प्रतिकारक्षमता आणि संरक्षणसिद्धता अधिक वाढली आहे.
  • नौदलाच्या ‘आयएनएस अरिघात’ या अणुऊर्जासंचिलात पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले.
  • ते 3,500किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकते.
  • ही चाचणी व्यापक आण्विक प्रतिकारक्षमता विकसित करण्याच्या भारताच्या योजनेमधील मैलाचा दगड ठरणार आहे.
  • शत्रूने अण्वस्त्र हल्ला  केल्यास याद्वारे त्याला प्रभावी प्रत्युत्तर देता येणार आहे. तसेच सागरी हद्दीच्या पलिकडेही देशाच्या सीमांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.
  • घन इंधनावर चालणारे के-4 क्षेपणास्त्र अण्वस्त्रक्षम पाणबुडीवरून सोडले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (एसएलबीएम) असून नौदलाला अण्वस्त्रांविरोधात प्रभावी अस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
  • ते ज्या ‘आयएनएस अरिघात’ वरून सोडण्यात आले ती भारताची दुसरी अणुऊर्जासंचिला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएबीएन) आहे.

 हेमंत सोरेन झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री

  • झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी रांची येथे एका भव्य सोहळ्यात झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • राज्याचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • विधानसभा निवडणुकीत झामुमोच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने 81 पैकी 56 जागांवर विजय मिळवला असून हेमंत सोरेन हे त्यांच्या बारहैत मतदारसंघातून जवळपास 40 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

डॉ. अवस्थी यांना रोशडेल पायोनियर्स पुरस्कार  प्रदान

  • आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचा सर्वोच्च सन्मान मानला जाणारा रोशडेल पायोनियर्स पुरस्कार नुकताच इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप लि.चे  व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी यांना जागतिक आयसीए परिषदेत आयसीएचे अध्यक्ष एरियल ग्वार्को यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • डॉ. वर्गीस कुरियन यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय आहेत.
  • कुरियन यांना 2001 मध्ये या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
  • डॉ. अवस्थी हे केमिकल इंजिनिअर असून ते 1976 मध्ये इफ्कोमध्ये (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप लि.)रुजू झाले.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची उत्पादनक्षमता 292 टक्क्यांनी वाढली व निव्वळ मालमत्तेत 688 टक्क्यांनी वाढ झाली.
  • त्यांच्या दूरदृष्टीने इफ्कोने विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये प्रवेश केला; तसेच नॅनो खतांचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले.

रोशडेल पायनियर्स अवार्ड

  • ‘रोशडेल पायनियर्स अवार्ड’ हा इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सकडून (ICA) दिला जाणारा सर्वोच्च मानाचा पुरस्कार आहे.
  • या पुरस्काराची सुरूवात 2000 मध्ये झाली होती.
  • नवकल्पकतेची जोड देऊन संस्थेला आर्थिकदृष्ट्या नव्या शिखरावर पोहोचवण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणे, हा या पुरस्कारामागील मूळ उद्देश आहे.

गोंड राणी दुर्गावती पुतळ्याचे अनावरण

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांदा येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गोंड राणी दुर्गावतीच्या पुतळ्याचे अनावरण केले.
  • महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात हा पुतळा उभारण्यात आला आहे.
  • मध्ययुगीन काळात गोंडवनाची राणी दुर्गावतीने आपले साम्राज्य वाचविण्यासाठी मुघलांशी संघर्ष केला होता.
  • राणी दुर्गावती : (५ ऑक्टोबर १५२४ – २४ जून १५६४). सोळाव्या शतकातील गोंडवाना (गडामंडला) साम्राज्याची कर्तृत्ववान व पराक्रमी राणी. त्यांचा जन्म चंदेलवंशीय महोबा येथील राजपूत घराण्यात झाला.
  • किरातराय (कीर्तिसिंह) व राणी कमलावती यांच्या त्या एकुलत्या राजकन्या.
  • दुर्गावतींना तीरकमठा, तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी, गोळाफेक, भालाफेक इत्यादी शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले. त्याचबरोबर त्यांनी संस्कृतशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला होता.
  • दुर्गावती महोबाच्या राजदरबारात राजकुमाराच्या वेषात सहभागी होत.शिकार करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
  • दुर्गावतींनी स पंधरा वर्षे गडामंडलाचा कारभार चालविला. त्यांच्या काळात गडामंडला हे गोंड राज्यातील एक संपन्न व समृद्ध राज्य म्हणून उदयास आले.
  • गडामंडलातील सु. १२,००० गावे थेट दुर्गावतींच्या ताब्यात असल्याचे उल्लेख सापडतात. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी दुर्ग, महाल, तलाव, मंदिर इत्यादींचे बांधकाम केल्याचे अवशेष पाहायला मिळतात. उदा., जबलपूर जवळील राणीतल अथवा राणी तलाव. तसेच त्यांनी इतर राज्यांसोबत व्यापारी संबंध जोपासले होते. गोंडवाना साम्राज्याचा हा सुवर्णकाळ होता.
  • राज्यात सुवर्णचलनाद्वारे वस्तुविनिमय होत. दुर्गावतींच्या ताब्यात ५२ गड आणि ५७ परगणे मिळून राज्याचा विस्तार हा सु. ७७,७०० चौ. किमी. पर्यंत होता. तसेच २०,००० घोडेस्वार, १००० हत्ती आणि मोठ्या प्रमाणात पायदळ असे विशाल सैन्य बळ त्यांच्याकडे होते. त्यांनी माळवा प्रदेशातील बहादुरशहा व मिआणा अफगाण यांचा लढाईत पराभव केल्याचे उल्लेख सापडतात (१५५५; १५६०).

अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2024

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा मधील भुवनेश्वर येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत.
  • भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे  आयोजन करण्यात आले आहे.
  • सदर परिषद ही दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 अशी तीन दिवस चालणार असून यामध्ये नवीन फौजदारी कायदे, दहशतवादाला प्रतिबंध, डाव्या विचारसरणीचा अतिरेक, तटीय सुरक्षा, अंमली पदार्थाची तस्करी रोखणे,   यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार आहे.
  • यासोबतच पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकही या परिषदेदरम्यान प्रदान करण्यात येणार आहे.
  • देशभरातल्या वरिष्ठ पोलिसांना आणि सुरक्षा प्रशासकांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर तसेच संचालन, पायाभूत सुविधा आणि पोलीस कल्याणविषयक विविध बाबींवर, भेडसावणाऱ्या अडचणींवर मुक्तपणे चर्चा करण्यासाठी एक संवादी व्यासपीठ, ही परिषद पुरवेल.
  • अंतर्गत सुरक्षा धोक्यांसह, गुन्हेगारी नियंत्रण व कायदा आणि सुव्यवस्था संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यावसायिक पद्धती आणि प्रक्रियांचे सुसूत्रीकरण आणि सामायिकीकरण यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल.
  • या परिषदेसाठी पंतप्रधान कायम उत्सुक असतात. पंतप्रधान अत्यंत बारकाईने ही चर्चा ऐकतात, त्याचसोबत ते  नव्या कल्पना पुढे याव्यात यासाठी अनौपचारिक आणि मुक्त वातावरणातल्या चर्चेला प्रोत्साहनही देतात. यावर्षी काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी या परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
  • संपूर्ण दिवसाचे प्रभावी नियोजन करण्यात आले असून सुरुवात योग सत्राने होईल.
  • कामकाज सत्र, सादरीकरण, चर्चा, कार्यशीलता सत्र, संकल्पना आधारित भोजन सत्र , अशी या परिषदेची वैशिष्ट्ये आहेत.
  • देशाला प्रभावित करणाऱ्या क्रिटिकल पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाबींवर, पंतप्रधानांसमोर आपले दृष्टिकोन आणि सूचना मांडण्याची मौल्यवान संधी यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळेल.
  • वार्षिक पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद देशातल्या विविध ठिकाणी व्हावी, यासाठी वर्ष 2014पासून पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले आहे.
  • तेव्हापासून गुवाहाटी (आसाम), कच्छचे रण (गुजरात), हैदराबाद (तेलंगणा), टेकनपूर (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश),  स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया, गुजरात), पुणे (महाराष्ट्र), लखनौ (उत्तर प्रदेश), नवी दिल्ली आणि जयपूर (राजस्थान) येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
  • ही परंपरा पुढे चालू ठेवत, भुवनेश्वर (ओडिशा) येथे 59 वी पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 आयोजित केली जात आहे.
  • या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह राज्यमंत्री, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *